कॅनडामधील शाळेत स्वतंत्र खलिस्तानसाठी आयोजित जनमताचा कार्यक्रम रहित !

ओटावा (कॅनडा) – ब्रिटीश कोलंबिया राज्यातील सरे शहरातील तामनवीस माध्यमिक शाळेत १० सप्टेंबर या दिवशी स्वतंत्र खलिस्तानसाठी खलिस्तान्यांनी लोकांचे जनमत घेण्याचे नियोजन केले होते. या कार्यक्रमाला दिलेली अनुमती प्रशासनाने मागे घेतल्याने जनमत घेण्याचा कार्यक्रम रहित करण्यात आला आहे.

१. याविषयी माहिती देतांना ‘सरे डिस्ट्रिक्ट स्कूल बॉर्ड’ने म्हटले आहे की, एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी शाळेतील जागा भाडेतत्त्वावर देण्याविषयी आमचे काही नियम आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आम्ही या कार्यक्रमाला अनुमती नाकारली. (म्हणजे नियम पाळले असते, तर अनुमती दिली असती. अशा शाळांवरही कारवाई हवी ! – संपादक)

२. जनमत घेण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्यावर त्याविषयीची पत्रके प्रसारित करण्यात आली. या पत्रकांवर शीख समुदाय बाळगत असलेल्या कृपाणासह (छोट्या चाकूसह) एके-४७ रायफलीचे छायाचित्रही त्यावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. ते आक्षेपार्ह असल्यामुळे कार्यक्रमाला अनुमती नाकारण्यात आली.

३. ‘फ्रेंड्स ऑफ कॅनडा अँड इंडिया’चे अध्यक्ष मणींदर सिंह यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. सरे शहराच्या महापौर ब्रँडा लॉक यांनीही शाळेच्या आवारात जनमत घेण्याविषयी नापसंती व्यक्त केली होती. त्यांनी म्हटले की, सरे शहर हे खलिस्तानी कारवाया किंवा ते घेत असलेले जनमत यांचे समर्थन करत नाही. त्यांनी पत्रकात वापरण्यात आलेल्या एके-४७ रायफलीच्या चित्रावरही आक्षेप घेतला.

संपादकीय भूमिका

  • कॅनडामध्ये खलिस्तानी आतंकवाद्यांच्या कारवाया दिवसेंदिवस वाढत आहेत. तेथील शाळेत जनमत घेण्याचे धारिष्ट्य खलिस्तानवादी घेतात आणि तेथील सरकार यात हस्तक्षेप करत नाही, हे संतापजनक ! भारत सरकार या प्रकरणात लक्ष घालणार का ?