मुंबई येथे ‘महेंद्रगिरी’ युद्धनौकेचे जलावतरण !

मुंबई, १ सप्टेंबर (वार्ता.) – येथील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एम्.डी.एल्.) येथे ‘प्रकल्प १७ ए’ मधील चौथी युद्धनौका असलेल्या ‘महेंद्रगिरी’चे १ सप्टेंबर या दिवशी जलावतरण झाले. उपराष्ट्रपती श्री. जगदीप धनखड यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड यांच्या हस्ते युद्धनौकेचे जलावतरण करण्यात आले. या सोहळ्याला मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, राज्यपाल श्री. रमेश बैस, कामगारमंत्री श्री. सुरेश खाडे, नौदलाचे अधिकारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

महेंद्रगिरी ही युद्धनौका स्वदेशी बनावटीची असून तिचे वजन ३ सहस्र ५१० टन इतके आहे. तिची रचना भारतीय नौदलाच्या ‘इन-हाउस ब्युरो ऑफ नेव्हल डिझाईन’ने केली आहे. तिची लांबी १४९ मीटर आणि रुंदी १७.८ मीटर इतकी आहे. युद्धनौका २ गॅस टर्बाइन्स आणि २ मुख्य डिझेल इंजिनच्या संयोजनाद्वारे समर्थित आहे. युद्धनौकेचा जास्तीतजास्त वेग २८ नॉट्स (सुमारे ५२ किमी प्रतिघंटा) इतका असून ती ताशी ५९ किमी वेगाने समुद्राच्या लाटांना भेदून धावू शकते.

ही युद्धनौका अत्याधुनिक शस्त्रे, सेन्सर्स, प्रगत कृती माहिती प्रणाली, एकात्मिक प्लॅटफॉर्म व्यवस्थापन प्रणाली, जागतिक दर्जाची मॉड्युलर निवास व्यवस्था, वीज वितरण प्रणाली आणि इतर अनेक प्रगत सुविधा या युद्धनौकेवर आहेत. पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणार्‍या सुपरसॉनिक क्षेपणास्त्र प्रणालीने ही युद्धनौका सुसज्ज आहे.