छत्रपती संभाजीनगर – ‘भारतीय रिझर्व्ह बँके’ने निर्बंध लादल्यामुळे अजिंठा नागरी सहकारी बँकेत अनुमाने ४० सहस्र ठेवीदारांच्या ४०० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. ३१ ऑगस्ट या दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बँकेच्या जुना मोंढा आणि उस्मानपुरा शाखेत खातेदार अन् ठेवीदार यांनी पैसे काढण्यासाठी मोठी गर्दी केली. दिवसभरात ५ सहस्र ठेवीदार बँकेत येऊन गेले.
‘बँकेचे व्यवहार पारदर्शी आहेत. कुठली तक्रार नाही. एन्.पी.ए. (अनुत्पादित मालमत्ता) नाही. मग चूक कुठे झाली ? हेच आम्हाला कळत नाही. तरीही ‘आर्.बी.आय.’चे निर्बंध का आले ? त्याचा आम्ही शोध घेत आहोत. तुम्ही निर्धास्त रहावे. तुमचे पैसे बुडणार नाहीत’, असे बँकेचे मुख्य अधिकारी ग्राहकांना समजावून सांगत होते.