पिंपरी-चिंचवड (जिल्हा पुणे) – येथे श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या जयंती सप्ताहानिमित्त समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने दुचाकी ‘रॅली’चे आयोजन करण्यात आले. या ‘रॅली’मध्ये पेशवे घराण्याचे दहावे वंशज श्री. पुष्कर पेशवे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचा प्रारंभ पिंपरी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून झाला.
या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर रचित छत्रपती शिवरायांची आरती सामूहिकरित्या करण्यात आली. त्यानंतर पिंपरीपासून नेहरूनगर येथील रंजना सभागृह या मार्गावर दुचाकी ‘रॅली’ काढण्यात आली.
या रॅली मार्गात जगद़्गुरु संत तुकाराम महाराज यांना पुष्पहार घालून संस्थेच्या सदस्यांनी अभिवादन केले. ब्राह्मण महिलांविषयी आक्षेपार्ह विधान करणार्या मुकेश माचकर या पत्रकाराविरोधात तक्रार प्रविष्ट करणार्या महिला, तसेच ‘पेशवीण काशीबाई’ कादंबरीच्या लेखिका सौ. अश्विनी कुलकर्णी यांचा संस्थेकडून सत्कार करण्यात आला. श्रीवर्धन येथील पेशवे स्मारकाच्या कामास संमती मिळूनही काम चालू झाले नसल्याची खंत ‘ब्राह्मण जागृती सेवा संघा’चे अध्यक्ष अंकित काणे यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमात ब्राह्मण सेवा संघाचे मुकुंद घोलप, गौड ब्राह्मणचे अनिल शर्मा, तसेच विश्व हिंदु परिषद, बजरंग दल अशा विविध संस्थेच्या मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. कार्यक्रमाची सांगता शिववंदना आणि मंत्रपुष्पांजली यांनी करण्यात आली.