पू. संभाजीराव भिडेगुरुजी २४ ऑगस्टला गोव्यात

दवर्ली येथील स्वामी समर्थगडावर व्याख्यानाचे आयोजन

पू. संभाजीराव भिडेगुरुजी

मडगाव, १९ ऑगस्ट (वार्ता.) – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे संस्थापक गुरुवर्य पू. संभाजी भिडेगुरुजी २४ ऑगस्ट या दिवशी गोव्यात येत आहेत. पू. संभाजी भिडेगुरुजी यांचे दवर्ली येथील स्वामी समर्थगडावर २४ ऑगस्ट या दिवशी दुपारी ३ वाजता ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी गोमंतकातील मठ-मंदिर आणि हिंदु धर्माच्या रक्षणार्थ दिलेले योगदान आणि पोर्तुगीजकालीन विध्वंस झालेल्या मंदिरांची पुनर्स्थापना’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी करासवाडा, म्हापसा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करणे, पाद्री बोलमॅक्स पेरेरा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणे, ‘आप’चे आमदार क्रूझ यांनी विधानसभा अधिवेशनात शिवजयंतीच्या खर्चावर आक्षेप घेणे आदी सूत्रांवरून गोव्यात सामाजिक आणि धार्मिक वातावरण ढवळून निघाले होते. या पार्श्‍वभूमीवर पू. संभाजी भिडे गुरुजी यांचे मौलिक असे मागदर्शन गोव्यातील शिवप्रेमींना लाभणार आहे.