‘जीवनगौरव’ पुरस्‍कार माझ्‍या गुरूंचा असून त्‍यांनी दिलेल्‍या ज्ञानाचा मी भारवाहक आहे ! – प्रा. अद्वयानंद गळतगे

पुणे येथील ‘जीवनगौरव’ पुरस्‍कार सोहळा !

सत्‍कारप्रसंगी डावीकडून प्रा. मिलिंद जोशी, डॉ. लक्ष्मीकांत पारनेरकर, प्रा. अद्वयानंद गळतगे, त्‍यांच्‍या मागे विंग कमांडर शशिकांत ओक, डॉ. अशोक कामत

पुणे – माझ्‍या जीवनात विविध अतींद्रिय शक्‍तींचे प्रमाण दर्शवणारे प्रसंग आले. त्‍या प्रसंगांचे कारण शोधण्‍याचा, भूत शोधण्‍याचाही मी प्रयत्न केला. अशा अनेक प्रसंगांत मला विशिष्‍ट ज्ञान देणारे गुरु मिळाले. काही प्रसंगांमध्‍ये महाराष्‍ट्र अंनिससारख्‍या संस्‍था मोडीत निघाल्‍या; कारण त्‍या प्रसंगांना सामोरे जाण्‍याचे धैर्य त्‍यांच्‍यात नव्‍हते. ‘जीवनगौरव’ पुरस्‍कार हा माझा नसून माझ्‍या गुरूंचा आहे. गुरूंनी दिलेल्‍या ज्ञानाचा मी भारवाहक या नात्‍याने हा पुरस्‍कार स्‍वीकारतो. आईन्‍स्‍टाईन, बोहर यांसारख्‍या शास्‍त्रज्ञांनीही भौतिक सिद्धांतांचा शोध लावून ब्रह्म विज्ञानाचे समर्थन केले आहे, असे परखड प्रतिपादन प्रा. अद्वयानंद गळतगे यांनी केले. ‘महाराष्‍ट्र साहित्‍य परिषदे’च्‍या माधवराव पटवर्धन सभागृहात झालेल्‍या ‘जीवनगौरव’ पुरस्‍कार सोहळ्‍यात ते बोलत होते.

वेदमंत्र पठण करताना आबासाहेब पटवर्धन वेदशास्त्र विद्यालय पुणे येथील वेदमूर्ती दत्तात्रेय श्रीपाद धायगुडे, वेदमूर्ती जयदीप प्रसाद जोशी, वेदमूर्ती अद्वैत अनंत जोशी, वेदमूर्ती वेदांत बाळकृष्‍ण कुलकर्णी

या प्रसंगी विंग कमांडर शशिकांत ओक, महाराष्‍ट्र साहित्‍य परिषदेचे अध्‍यक्ष डॉ. मिलिंद जोशी, कार्यक्रमाचे अध्‍यक्ष आणि संत साहित्‍याचे अभ्‍यासक डॉ. अशोक कामत, पूर्णवाद अभ्‍यासक डॉ. लक्ष्मीकांत पारनेरकर, वेदांत गळतगे यांसह अनेक मान्‍यवर आणि श्रोता वर्ग उपस्‍थित होता. वेदमंत्रपठणाने कार्यक्रमाला आरंभ झाला. त्‍यानंतर मान्‍यवरांची ओळख आणि सत्‍कार करण्‍यात आले. प्रा. गळतगे यांचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते ‘जीवनगौरव’ पुरस्‍काराने सन्‍मान करण्‍यात आला. प्रा. गळतगे यांचे मार्गदर्शन आणि अध्‍यक्ष डॉ. अशोक कामत यांचे अध्‍यक्षीय भाषण झाले. शेवटी अन्‍य उपस्‍थित मान्‍यवरांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले.

प्रा. अद्वयानंद गळतगे पुढे म्‍हणाले की, भविष्‍यात घडणार्‍या घटनांचे ज्ञान अगस्‍ति ऋषि आणि त्‍यांचे शिष्‍य यांना आधीच होत असे. नाटक आधी लिहिले जाते आणि मग रंगमंचावर सादर केले जाते. जगाच्‍या रंगमंचावर जीवनरूपी नाटक चालले असल्‍याचे ज्ञान मला अगस्‍ति ऋषि यांच्‍या नाडीभविष्‍यातून झाले. हे नाटक ‘विधी’ने म्‍हणजेच ब्रह्माने लिहिले असल्‍याने त्‍याला ‘विधीलिखित’ असे म्‍हणतात.

नाडीमध्‍ये लिहलेले भविष्‍य हे वर्तमानात कर्मसिद्धांत योग्‍य पद्धतीने वापरण्‍यासाठी मार्गदर्शक असते ! – शशिकांत ओक, विंग कमांडर

मार्गदर्शन करताना विंग कमांडर शशिकांत ओक

प्रारंभी विंग कमांडर शशिकांत ओक यांनी प्रास्‍ताविक केले त्‍यामध्‍ये मनोगत व्‍यक्‍त करताना ते म्‍हणाले की, ज्ञानतपस्‍वी प्रा. गळतगे हे माझ्‍या पित्‍यासमान आहेत. त्‍यांचे आणि माझे ३० वर्षांपासूनचे संबंध आहेत. माझी पोस्‍टिंग तांबरम हून श्रीनगर मध्‍ये झाली आणि नेमके प्रा. गळतगे हे मला चमत्‍कारिकरित्‍या श्रीनगरला भेटले. त्‍यांनी माझ्‍या समवेत नाडी भविष्‍य पाहिले तेव्‍हा त्‍यांची नाडीपट्टी तंतोतंत आली, तसेच माझेही नाव त्‍यात आले. त्‍यांचे वय त्‍यावेळी ६७ वयाचे होते. पट्टीमध्‍ये त्‍यांचे वय ६७  वर्षे असे उल्लेखित असल्‍याने त्‍याआधी आणि त्‍यानंतर हा योग आला नसता. प्रा. गळतगे म्‍हणतात नाडीभविष्‍यातील भविष्‍य कथन चुकवले जाते कारण नाडीमध्‍ये लिहलेले भविष्‍य हे भविष्‍य सांगण्‍यासाठी नव्‍हे, तर त्‍यातून बोध घेऊन वर्तमानात कर्मसिद्धांत योग्‍य पद्धतीने वापरण्‍यासाठी मार्गदर्शक असते. प्रा. गळतगे यांचे लेखन एकटाकी आहे, म्‍हणजे ते एकदाच लिहतात हे त्‍यांचे वैशिष्ट्य आहे. ९२ व्‍या वर्षी माझ्‍या अल्‍पशा पुढाकारातून प्रा. गळतगे यांचा जीवनगौरव होत आहे याचा मला आनंद आणि अभिमान आहे.

डॉ. लक्ष्मीकांत पारनेरकर यांच्‍या हस्‍ते प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांना जीवनगौरव पुरस्‍कार देऊन सन्‍मानित करताना.

प्रत्‍येक चमत्‍कारामागे काहीतरी ईश्‍वरी योजना असते, हे प्रा. गळतगे यांनी मांडले आहे ! – डॉ. अशोक कामत

श्रद्धा आणि अंधश्रद्धा हा विषय प्रा. गळतगे यांनी हाताळला आहे. त्‍यांचे सर्व लेखन श्रद्धा याचा अन्‍वयार्थ सांगणारी आहेत. त्‍यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाच्‍या नावाखाली बुद्धिभेद करणार्‍या मंडळींचा समाचार घेतला आहे. मुलाचे नाव मुस्‍लिम ठेवले, तर हिंदू मुसलमान ऐक्‍य साधले जात नसते. इतिहासातील विषयांच्‍या मागे विज्ञान आहे. आपल्‍याकडे अज्ञान असल्‍याने आपल्‍याला ते कळत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची काडीचीही माहिती नसलेले लोक त्‍यांचे नाव घेऊन राजकारण करत आहेत. प्रा. गळतगे यांनी केलेले लेखन एकमेव आहे. मेकॉले प्रणित पाठ्यक्रमामुळे माणसे भारावून गेली होती.आजही तसेच वातावरण आहे. आपण ज्‍याला चमत्‍कार म्‍हणतो, त्‍यामागे कार्यकारणभाव असतो. तो समजून घेण्‍याचे शास्‍त्र म्‍हणजे ज्‍योतिषशास्‍त्र, नाडीशास्‍त्र होय. प्रत्‍येक चमत्‍काराच्‍या पार्श्‌वभूमीला काहीतरी ईश्‍वरी योजना असते हे प्रा. गळतगे यांनी त्‍यांच्‍या पुस्‍तकांतून सांगितले आहे.

पुष्पगुच्छ स्‍वीकारताना प्रा. अद्वयानंद गळतगे

प्रा. गळतगे यांच्‍याकडे पाहून आपले जीवनही आपण गौरवान्‍वित करू शकतो हे आपल्‍याला शिकायला मिळते ! – डॉ. लक्ष्मीकांत पारनेरकर

निश्‍चित कोणाकडे काय मागावे हे शिकवणारा गुरु असतो. आपल्‍या भारतीय परंपरेत गुरूंचे अतिशय महत्त्व आहे. प्रा. गळतगे यांनी ज्ञानाची भूमिका, तसेच सर्व शास्‍त्रे एकत्र येऊन तत्‍वज्ञानात मिसळतात, असे सांगणार्‍या मानवी जीवनाच्‍या तत्‍वज्ञानाची काय भूमिका आहे, हे सांगण्‍याचा प्रयत्न केला आहे. मानवाला जगावे वाटणे ही ईश्‍वरदत्त प्रेरणा आहे. जीवनाचे महत्त्व कळले की जीवनाचा गौरव होतो. आजकाल अतिशय क्षुल्लक कारणावरून मनाच्‍या विरोधात काही घडल्‍यास जीवन संपवण्‍याचा निर्णय घेतला जातो. जीवन ही कला आहे हा सिद्धांत कळायला हवा. अशा जीवनाचे दर्शन घ्‍यायला मला या माध्‍यमातून मला मिळाले. प्रा. गळतगे यांच्‍याकडे पाहून आपले जीवनही आपण गौरवान्‍वित करू शकतो हे आपल्‍याला शिकायला मिळते.

प्रा. गळतगे यांची साधना अतिशय मार्गदर्शक ! – मिलिंद जोशी

जन्‍म आणि मृत्‍यू, उत्‍पत्ती आणि विनाश या दोन्‍ही गोष्‍टी प्रत्‍येकाच्‍या वाट्याला येणार आहेत. या दोहोंच्‍या मधील जगणे अधिक सुंदर करणे हे मनुष्‍याच्‍या हातात आहे. ज्ञान, प्रेम, कर्म आणि त्‍याग यांमुळे जीवन समृद्ध होते. प्रा. गळतगे यांनी विविध विषयांचा अभ्‍यास केला, अनुभव घेतला. त्‍यांची ती साधना आहे आणि आपल्‍या सर्वांसाठी ती मार्गदर्शक आहे. जीवनरहस्‍याचा घेतलेला शोध म्‍हणजे अध्‍यात्‍म आहे, असे योगी अरविंद यांच्‍या सहयोगी, माताजी म्‍हणतात. अनेक अनुभव शब्‍दातीत, कल्‍पनातीत आहेत आणि यांचा विचार करणार्‍या व्‍यक्‍तींपैकी एक म्‍हणजे प्रा. गळतगे हे आहेत.

अंनिसच्‍या खोटेपणाची लक्‍तरे वेशीवर टांगली !

प्रा. गळतगे पुढे म्‍हणाले की, सोलापूर जिल्‍ह्यातील मोहोळ तालुक्‍यातील अनुराधा देशमुख यांच्‍या हातून झालेल्‍या चमत्‍कारांमुळे महाराष्‍ट्र अंनिस ही संस्‍था मोडीत निघाली आहे; कारण त्‍यांना सामोरे जाण्‍याचे धाडस अंनिसमध्‍ये नाही. कोल्‍हापूरमध्‍येही एका दिवाळी मासिकात मी लिहिलेल्‍या लेखांमुळे अंनिसच्‍या खोटेपणाची लक्‍तरे वेशीवर टांगली गेली. हे लेख वाचून विंग कमांडर शशिकांत ओक यांची माझी भेट झाली आणि नाडीपट्टीचा शोध घेण्‍यासाठी आम्‍ही ताम्‍बरम येथे गेलो. भानामती, कर्णपिशाच्‍च, करणी यांसारख्‍या अनेक गोष्‍टींचे अनुभव आल्‍यानंतर ते मी ग्रंथांच्‍या माध्‍यमातून शब्‍दांत मांडले आहेत.