मुंबई, ८ ऑगस्ट (वार्ता.) – काही दिवसांपूर्वी साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी एका कार्यक्रमात भाषण करतांना छत्रपती शिवरायांना अल्प लेखून हिंदुद्रोही औरंगजेबाला मोठे करण्याचा प्रयत्न केला. इतिहासात शिवरायांना औरंगजेबापेक्षा लहान दाखवण्याच्या षड्यंत्राला त्यांनी खतपाणी घातले आहे. त्यामुळे छत्रपती शिवरायांचा द्वेष करणार्या अशा लोकांना आपल्या देशात पुरस्कार द्यायचे का ? नेमाडे यांना सरकारने दिलेले पुरस्कार परत घेतले पाहिजेत, अशी मागणी भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी ८ ऑगस्ट या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
(सौजन्य : TOP NEWS MARATHI)
आमदार नितेश राणे म्हणाले की, ‘औरंगजेब हिंदुद्वेष्टे नव्हते’, असे नेमाडे यांनी सांगितले आहे. औरंगजेबाने असंख्य हिंदु मंदिरे तोडली, हिंदु महिला आणि समाज यांच्यावर अनन्वित अत्याचार केले, याची इतिहासात नोंद आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून औरंगजेबाच्या विरोधात संघर्ष केला. छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्या धर्मांतरासमोर झुकले नाहीत. अशा औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्याचे षड्यंत्र चालू आहे.
ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबई येथील पथकर बंद करण्याची मागणी केली आहे. त्यावर टीका करतांना आमदार नीतेश राणे म्हणाले की, मातोश्रीचे पथकर बंद झाल्यामुळे या लोकांना मुंबईच्या पथकाराची आठवण होत आहे. सर्व व्यय बंद झाल्यामुळे त्यांनी अप्रत्यक्षपणे कंत्राटदारांना या निमित्ताने भडकावून परत हप्ते वसुली चालू करायची आहे.
ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे हे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी भ्रमणभाषद्वारे चर्चा करणार आहेत, याविषयी नितेश राणे म्हणाले की, आतापर्यंत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचा अवमानच केला आहे. राज ठाकरे यांचा कितीवेळा अवमान करणार आहेत, हे एकदा उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला सांगून टाकावे. उद्धव ठाकरे यांच्याशी बोलायचे कि नाही ? याविषयी राज ठाकरे निर्णय घेतील.