मणीपूर विषयावरून गोवा विधानसभेत  विरोधकांकडून पुन्हा गोंधळ

सभापतींशी चर्चा  करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आमदारांना आश्वासन

मणीपूर विषयावर विरोधकांकडून पुन्हा गोंधळ !

पणजी, १ ऑगस्ट (वार्ता.) – मणीपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर विधानसभेत चर्चा करावी, या मागणीला अनुसरून विरोधी गटातील आमदारांनी १ ऑगस्ट या दिवशी पुन्हा गदारोळ केला. विरोधकांनी शून्य प्रहराच्या वेळी सभापतींच्या आसनासमोर जाऊन विधानसभेचे कामकाज रोखून धरण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘या प्रकरणी अगोदर सभापती रमेश तवडकर यांच्याशी चर्चा करू’, असे आश्वासन दिल्यानंतर विरोधकांनी माघार घेतली आणि ते आसनस्थ झाले.

१. मणीपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्याची मागणी फेटाळल्यानंतर ३१ जुलै या दिवशी विधानसभेत असभ्य वर्तन केल्याच्या प्रकरणी सभापतींनी विरोधी गटातील ७ सदस्यांना २४ घंट्यांसाठी सभागृहातून निलंबित केले होते.

२. हा कालावधी १ ऑगस्ट या दिवशी दुपारी १२.३० वाजता संपल्यानंतर विरोधी गटातील सातही सदस्यांनी शून्य प्रहर चालू होताच विधानसभेत प्रवेश केला. विरोधी गटातील सर्व सदस्य ‘मणीपूर हिंसाचारा’च्या सूत्रासाठी काळे कपडे परिधान करून आले होते.

३. शून्य प्रहर चालू होताच विरोधी गटातील सदस्यांनी ‘मणीपूर’च्या सूत्रावर चर्चा करण्याची मागणी केली आणि यासंबंधीचे फलक हातात घेतले.

४. यावर सभापती रमेश तवडकर म्हणाले, ‘‘सभागृहाचा वेळ वाया घालवू नका. ४ ऑगस्ट या दिवशी खासगी विधेयक मांडण्याच्या दिवशी विरोधक मणीपूरचे सूत्र मांडू शकतात.’’

५. विरोधी गटातील सदस्यांनी ४ ऑगस्ट या दिवशी ‘मणीपूर हिंसाचारा’च्या सूत्रावर चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन सभापतींनी द्यायची मागणी केली.

या वेळी सभापतींनी ‘याविषयी शुक्रवारी सांगतो’, असे म्हटल्यावर विरोधी गटातील सदस्यांचे  समाधान झाले नाही. यानंतर मुख्यमंत्र्यांनी सभापतींशी चर्चा करण्याविषयीचे आश्वासन दिल्यानंतर विरोधक शांत झाले.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी ‘आक्षेपार्ह’ विधान मागे घेतले !

हा गदारोळ चालू असतांना सभापती रमेश तवडकर वारंवार सदस्यांना जागेवर बसण्यास सांगत होते. या वेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी ‘मी जागेवर बसणार नाही’, असे म्हटले. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी या विधानाला तीव्र आक्षेप घेऊन ‘हा सभापतींच्या आसनाचा अवमान आहे’, असे म्हटले. यानंतर युरी आलेमाव यांनी आक्षेपार्ह विधान मागे घेतले.