गोवा राज्यात प्राथमिक शिक्षकांची २७० पदे रिक्त

गोवा विधानसभा पावसाळी अधिवेशन

पणजी, २४ जुलै (वार्ता.) – गोवा राज्यात एका बाजूने सरकारी प्राथमिक शाळा बंद होत असतांनाही शिक्षकांची २७० पदे रिकामी असल्याची माहिती समोर आली आहे. साळगांवचे आमदार केदार नाईक यांच्या विधानसभेतील एका प्रश्नावरील लेखी उत्तरातून प्राथमिक शिक्षकांची २७० पदे रिक्त असल्याची माहिती उघड झाली आहे.

साळगांवचे आमदार केदार नाईक

या लेखी उत्तरामधून मिळालेल्या महितीनुसार २७० पैकी १४२ पदांसाठी भरती प्रक्रिया चालू असून अजून त्यांची भरती व्हायची आहे. यासाठी उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली असून पुढील प्रक्रिया शिल्लक आहे. उर्वरित १२८ पदांची भरती आयोगाकडून होणार आहे. १२८ पदांसाठी सरकारने आयोगाकडे प्रस्ताव पाठवला असून आयोगाकडून लवकरात लवकर भरती करण्यात येणार आहे. या महितीनुसार काही शिक्षकांची भरती लेखी परीक्षेतून आणि उर्वरित शिक्षकांची भरती आयोगाकडून असा भेद असल्याचे स्पष्ट होत आहे.

संपादकीय भूमिका

  • शिक्षकांची पदे रिक्त असतील, तर त्या शाळांत पालक त्यांच्या मुलांना कशाला भरती करतील ?
  • सरकारी शाळा बंद होण्यामागे ‘शाळेत शिक्षक नसणे’ हेही कारण आहे का ? शोधावे लागेल !