सिंधुदुर्ग : कुडाळ येथे विजेच्या धक्क्याने वीजवितरणचे कर्मचारी गंभीर घायाळ

(प्रतिकात्मक चित्र)

कुडाळ – येथील श्री देव गवळदेव मंदिराजवळील अभिमन्यू हॉटेल समोर विद्युत्वाहिनीच्या खांबावर दुरुस्तीचे काम करत असतांना वीजवितरणचे कर्मचारी धनंजय फाले हे विजेचा धक्का लागून गंभीर घायाळ झाले.

फाले हे विजेच्या धक्क्याने खांबावरच चिकटले. त्यानंतर वीजपुरवठा बंद करण्यात आला. वीजवितरणचे कर्मचारी आणि एम्.आय.डी.सी.चे अग्नीशमन दल अन् नागरिक यांच्या साहाय्याने त्यांना खाली उतरवण्यात आले. फाले यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.

यंत्रणेअभावी कर्मचारी ४५ मिनिटे खांबावरच

फाले यांना विजेचा धक्का लागल्यानंतर त्यांना खाली उतरवण्यासाठी वीज वितरण आस्थापनाकडे कोणतीही आपत्कालीन यंत्रणा नसल्याचे उघड झाले. खांबावर उंचावर पोचतील अशा शिड्या, झाडे कापण्याचे साहित्य आणि अन्य साहित्य नसल्याने फाले हे ४५ मिनिटे खांबावरच लोंबकळलेल्या स्थितीत होते. (किमान आतातरी वीजवितरण आस्थापनाने कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसाठी योग्य यंत्रणा उभारावी, ही अपेक्षा ! – संपादक)