पिंपरी (पुणे) – येथील सेवा विकास बँकेचे माजी संचालक आणि माजी उपमहापौर अमर मूलचंदानी यांना अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) कह्यात घेतले आहे. मुंबईतील विशेष न्यायालयाने त्यांना ७ जुलैपर्यंत इडी कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अमर मूलचंदानी यांच्या विरोधात ईडीने २८ जानेवारी या दिवशी कारवाई केली होती. अपव्यवहार प्रकरणी मूलचंदानी यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांच्या निवासस्थानी, तसेच कार्यालयावर ईडीने धाडी घातल्या होत्या. कारवाईत असहकार्य केल्याप्रकरणी, तसेच सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे मूलचंदानी यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवर स्वतंत्र गुन्हाही नोंद केला होता. मूलचंदानी यांनी अवैध कर्ज संमत करून अपव्यवहार केला होता. त्यांनी केलेल्या अपव्यवहारात रोझरी शाळेचे विनय आराहाना, सागर सूर्यवंशी, खेमचंद भोजवानी सामील असल्याने त्यांच्या विरोधातही कारवाई करण्यात आली होती.
संपादकीय भूमिका :अपव्यवहाराचे पैसे संबंधितांकडूनच वसूल करून त्यांना कठोर आणि त्वरित शिक्षा व्हायला हवी ! |