मुंबईतील श्री मुंबादेवी आणि श्री महालक्ष्मीदेवी देवस्थानांच्या परिसराचा विकास करणार ! – दीपक केसरकर, पालकमंत्री, मुंबई

मुंबईसाठी अन्य नव्या योजना !

मुंबई, ७ जुलै (वार्ता.) – सर्वांची दृढ श्रद्धा असलेल्या श्री मुंबादेवीच्या मंदिराचा कायापालट करण्यात येणार आहे. श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिराच्या विकासाचा आराखडा बनवण्याची सूचना देण्यात आली आहे. यासह बाणगंगा या ऐतिहासिक ठिकाणी लेझर कार्यक्रमाद्वारे येथील ऐतिहासिक महत्त्व दाखवले जाणार आहे. सिद्धिविनायक मंदिराच्या विकासासाठीचा उर्वरित निधी देण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी ६ जुलै या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.

श्री महालक्ष्मीदेवी मंदिर

या वेळी दीपक केसरकर म्हणाले की, श्री मुंबादेवीच्या मंदिरासाठी १० कोटी रुपये संमत करण्यात येणार असून त्यांतील ३ कोटी रुपये पर्यटन विभागाकडून, तर उर्वरित निधी मुंबई महानगरपालिकेकडून दिला जाणार आहे. श्री सिद्धिविनायक मंदिराच्या विकासासाठी संमत करण्यात आलेल्या २५ कोटी रुपयांतील उर्वरित निधी देण्यात येणार आहे.

दीपक केसरकर यांनी घोषित केलेल्या नव्या योजना !

दीपक केसरकर

१. झोपडपट्ट्यांमध्ये रहाणार्‍या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका आणि वाचनालये उभारण्यात येणार आहेत. याविषयी महानगरपालिकेकडून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत.

२. कुलाबा, वरळी आणि माहीम येथील कोळीवाड्यांमध्ये ‘फूडकोर्ट’ची निर्मिती केली जाणार आहे. यामध्ये कोळी बांधवांसाठी मासे, तसेच सागरी उत्पादन विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या ठिकाणी मासे वाळवण्यासाठी जागाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

३. मुंबईतील जागेची कमतरता लक्षात घेता बेस्टच्या जुन्या गाड्या मध्यभागी कापून सार्वजनिक उद्याने केली जाणार आहेत. त्यासाठी १३ कोटी रुपये संमत करण्यात आले आहेत.

४. मुंबईमध्ये १ एकर भूमीत अत्याधुनिक मत्स्यालयाची निर्मिती केली जाणार आहे. राज्यशासन आणि महानगरपालिका यांद्वारे हा संयुक्त प्रकल्प राबवला जाणार आहे.

५. हाजीअली दर्ग्याच्या मार्गात खाडीचे पाणी साचते. ही पायवाट उंच करण्यासाठी २० कोटी रुपये निधी संमत करण्यात आला आहे.

६. पादचारी मार्गावर रहाणार्‍या नागरिकांसाठी रात्रीचा निवारा आणि स्नान यांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

वृद्धांसाठी ‘डे केअर सेंटर’ चालू करणार !

मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘डे केअर सेंटर’ निर्माण केले जाणार असून त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळ्याच्या दृष्टीने कार्यक्रम असणार आहेत. यासाठी मुंबईतील १० प्रभागांतून प्रत्येकी १ गाडी सकाळच्या सत्रात सोडण्यात येणार आहे. ही गाडी वृद्धांना या केंद्रामध्ये सोडेल, असे दीपक केसरकर यांनी सांगितले.