मध्यप्रदेश उच्च न्यायालयाची सर्वोच्च न्यायालयाला विनंती !
ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) – सहमतीने शरीरसंबंध ठेवण्याचे वय १८ ऐवजी १६ वर्षे करावे, अशी विनंती मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या ग्वाल्हेर खंडपिठाने सर्वोच्च न्यायालयाला एका खटल्यावरील सुनावणीच्या वेळी केली.
१. उच्च न्यायालयाने म्हटले की, इंटरनेटच्या युगात मुले लवकर वयात येत आहेत. अनेक किशोरवयीन मुले १८ वर्ष पूर्ण होण्याआधीच मुलींशी शारीरिक संबंध ठेवत आहेत. त्यानंतर पोलीस त्यांना ‘पॉस्को’ कायद्यांतर्गत अटक करतात. या कारवाईमुळे मुलांच्या भवितव्यावरही परिणाम होत आहे. वयात येत असतांना विरुद्ध लिंगी व्यक्तीविषयी आकर्षण वाटणे स्वाभाविक आहे; मात्र मुलांकडून शारीरिक संबंध ठेवले जातात आणि भविष्य अंधकारमय होते.
(सौजन्य : News18 MP Chhattisgarh)
२. ग्वाल्हेरमध्ये राहुल जाटव याच्याविरुद्ध १४ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला. त्याला अटक करण्यात आली असून अद्यापही तो कारागृहात आहे.
३. पीडित मुलगी शिकवणी वर्गामध्ये शिकण्यासाठी जात होती. १८ जानेवारी २०२० या दिवशी ती वर्गाला गेली, तेव्हा तेथे कुणीच नव्हते. तेथे उपस्थित असलेल्या राहुलने तिला ज्यूस पाजले. त्यानंतर मुलगी बेशुद्ध पडली. यानंतर राहुलने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले आणि अश्लील व्हिडिओ बनवले. त्याद्वारे त्याने पीडित मुलीला व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देत वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. पीडित मुलगी गरोदर राहिली. न्यायालयाच्या अनुमतीनंतर तिचा गर्भपात करण्यात आला.
४. राहुलच्या अधिवक्त्याने न्यायालयाला सांगितले की, दोघांमधील संबंध सहमतीने होते आणि राहुलला विनाकारण गोवण्यात आले आहे. राहुलविरुद्ध नोंदवण्यात आलेला गुन्हा रहित करण्याची मागणीही त्यांनी केली. त्यांची मागणी मान्य करत न्यायालयाने गुन्हा रहित करत सहमतीने संबंध ठेवण्याचे वय १८ वर्षांऐवजी १६ वर्षे करण्याचा विचार करावा, अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली.
संपादकीय भूमिकालहानपणापासूनच मुला-मुलींना साधना शिकवल्यास त्यांची बुद्धी सात्त्विक बनून ते अयोग्य गोष्टी करणार नाहीत ! सरकारने यासाठी प्रयत्न केले पाहिजे ! |