जिहादी वृत्तीच्या लोकांचाच समान नागरी कायद्याला विरोध ! – उत्तराखंडचे मुख्यमंत्री धामी

डेहराडून (उत्तराखंड) – समान नागरी संहितेसाठी देशभरात गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होत आहे. आम्ही गतवर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी जनतेसमोर संकल्प केला होता की, निवडून आलो, तर समान नागरी कायदा लागू करू,  याचा मसुदा बनवण्यासाठी समितीची नेमणूक करू. समितीने सर्व वर्गातील लोकांशी संवाद साधला आहे. त्याचा मसुदा सिद्ध होत आहे. जे लोक जिहादी वृत्तीचे आहेत, ते याला विरोध करू शकतात; परंतु देशातील सर्वसामान्य जनता याने प्रसन्न आहे. मुसलमान महिला आणि बुद्धीजिवी वर्ग यांचे या कायद्याला समर्थन आहे, असे वक्तव्य उत्तराखंड राज्याचे भाजपचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी केले. ते एका हिंदी वर्तमानपत्राने घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते.

सरकारी भूमींवरील अतीक्रमणाला योग्य कोण ठरवू शकते ?

भूमी जिहादवरून विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देतांना धामी म्हणाले की, कोणत्याही वर्गाला हानी पोचवणे हा आमचा उद्देश नाही. उत्तराखंड देवभूमी आहे. येथे कुणामध्ये कटुता नाही. जेवढ्या काही सरकारी भूमींवर अतीक्रमण करण्यात आले आहे, ते अतिक्रमण करणार्‍यांनीच हटवावे. २ सहस्त्र २०० एकर भूमीवरील अतिक्रमण हटवण्यात आले आहे. एका राजकीय पक्षाने देशाच्या स्वातंत्र्यानंतर तुष्टीकरण केले. त्यांना हे रुचत नाही. सरकारी भूमींवरील अतिक्रमणाला योग्य कोण ठरवू शकते ?