सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवाच्‍या वेळी सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

१. ब्रह्मोत्‍सवाच्‍या दिवशी तिन्‍ही गुरूंचा अवर्णनीय दर्शनसोहळा पहातांना पुष्‍कळ भावजागृती होऊन भावाश्रू येणे आणि तिन्‍ही गुरूंच्‍या डोळ्‍यांतूनही भावाश्रू येणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘ब्रह्मोत्‍सवाच्‍या दिवशी माझी पुष्‍कळ भावजागृती होत होती. तिन्‍ही गुरूंचे जवळून प्रत्‍यक्ष दर्शन झाल्‍यावर मला भावाश्रू आवरतच नव्‍हते. मला हुंदके येत असतांना तिन्‍ही गुरूंच्‍या डोळ्‍यांतही भावाश्रू होते. हा दर्शनसोहळा इतर वेळेच्‍या दर्शनसोहळ्‍यापेक्षा पुष्‍कळ निराळा होता. दर्शनसोहळ्‍यासाठी आलेल्‍या प्रत्‍येक साधकाच्‍या डोळ्‍यांमध्‍ये भावाश्रू होते. सगळे जण जीव एकवटून, डोळ्‍यांत प्राण आणून तिन्‍ही गुरूंचे दर्शन घेत होते आणि तिन्‍ही गुरुही वात्‍सल्‍यभावाने सगळ्‍यांकडे पहात होते. ते दृश्‍य इतके अवर्णनीय होते की, मी त्‍याचे शब्‍दांत वर्णन करू शकत नाही.

२. ब्रह्मोत्‍सवासाठी उपस्‍थित असलेले देवीदेवता, ऋषिमुनी, दैवी शक्‍ती आणि सात्त्विक जीव सर्व जण जणू या अद़्‍भुत दैवी सोहळ्‍याची आतुरतेने वाट पहात असणे

ब्रह्मोत्‍सवाच्‍या वेळी पुष्‍पवृष्‍टी होत असतांना सूक्ष्मातून देवीदेवता, ऋषिमुनी, दैवी शक्‍ती आणि सात्त्विक जीव तिथे उपस्‍थित होते. ते सर्व जण विष्‍णुस्‍वरूप सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या रथावर पुष्‍पवृष्‍टी करत होते. जवळजवळ ३० मिनिटे ही पुष्‍पवृष्‍टी चालू होती. तो सोहळा पहाण्‍यासाठी आलेले सर्व देवीदेवता, ऋषिमुनी, दैवी शक्‍ती आणि सात्त्विक जीव या अद़्‍भुत क्षणाची वाट पहात होते. ‘आज प्रत्‍यक्ष श्रीविष्‍णूचे दर्शन होत आहे. आम्‍ही किती पुण्‍य केल्‍यावर, किती काळानंतर हे दर्शन होत आहे’, या भावाने सर्वांच्‍याच डोळ्‍यांतून भावाश्रू वहात होते.

३. तिन्‍ही गुरु सूर्यासारखे तेजस्‍वी दिसून ‘हा सोहळा विष्‍णुलोकात चालू आहे’, असे जाणवणे

सद्गुरु (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ हे तिन्‍ही गुरु पुष्‍कळ तेजस्‍वी दिसत होते. जणू काही ‘ते तीन सूर्यच आहेत’, असा प्रचंड प्रकाश मला त्‍यांच्‍या ठिकाणी दिसत होता. ‘गुरुदेव (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) मोठा सूर्य आणि श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ, म्‍हणजे दोन छोटे सूर्य’, असे मला जाणवत होते. ‘आम्‍ही सर्व जण पृथ्‍वीवर नाहीच, सर्व जण पुष्‍कळ वर उचलले गेलो असून जणू विष्‍णुलोकात हा सोहळा चालू आहे’, असे मला जाणवले. गुरुदेवांच्‍या कृपेनेच आम्‍हाला पृथ्‍वीवर विष्‍णुलोकाची अनुभूती अनुभवता आली.

४. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी उत्तराधिकाराचे ताम्रपत्र श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ यांना दिले, तेव्‍हा त्‍या दोघी पुष्‍कळ भव्‍य दिसून त्‍यांची शक्‍ती संपूर्ण ब्रह्मांडात पसरली आहे’, असे दिसणे

‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्‍यांच्‍या हस्‍ताक्षरातील उत्तराधिकाराचे ताम्रपत्र श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ यांना दिले. तेव्‍हा तिथे पुष्‍कळ मोठ्या प्रमाणामध्‍ये शक्‍तीचा स्रोत कार्यरत होऊन तो संपूर्ण ब्रह्मांडामध्‍ये वेगाने पसरत आहे’, असे मला जाणवले. मला श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ या दोघीही फार भव्‍य दिसल्‍या अन् उत्तराधिकाराचे ताम्रपत्रही पुष्‍कळ मोठे दिसले. ‘त्‍या दोघी संपूर्ण ब्रह्मांडात सामावल्‍या असून त्‍यांची शक्‍ती पूर्ण ब्रह्मांडामध्‍ये पुष्‍कळ मोठ्या प्रमाणात पसरली आहे’, असे मला दिसले.

५. श्री. विनायक शानभाग उत्तराधिकारपत्राचे वाचन करतांना ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या आवाजात ते वाचन होत असून तशी आकाशवाणी होत आहे आणि ती सप्‍तलोकांतील सर्व जिवांना आश्‍वस्‍त करत आहे’, असे जाणवणे

श्री. विनायक शानभाग (आध्‍यात्मिक पातळी ६७ टक्‍के) यांनी उत्तराधिकाराचे ताम्रपत्र वाचून ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी आपला उत्तराधिकार श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ यांना दिला आहे’, असे सांगितले. विनायकदादा उत्तराधिकारपत्र वाचत असतांना मला ते सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या वाणीतूनच ऐकू आले. साक्षात् सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ‘मी माझा उत्तराधिकार या दोघींकडे देत आहे’, असे पूर्ण विश्‍वातील, पूर्ण ब्रह्मांडातील सर्व जिवांना आणि देवतांना सांगत आहेत’, अशी आकाशवाणी होत असून ती संपूर्ण ब्रह्मांडातील, सप्‍तलोकांतील सर्व साधक जिवांना आश्‍वस्‍त करणारी होती’, असे मला जाणवले.’

– सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर, ठाणे सेवाकेंद्र (११.५.२०२३)

‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या उपस्‍थितीनेच यज्ञातील अडथळे दूर झाले’, अशी सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर यांना आलेली अनुभती

१. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले उपस्‍थित राहिल्‍यामुळे यज्ञातील सर्व अडथळे दूर होत असून ‘यज्ञाचे चैतन्‍य पुष्‍कळ पटींनी कार्यरत होऊन ते संपूर्ण जगामध्‍ये प्रक्षेपित होत आहे’, असे अनुभवणे

‘प्रत्‍येक यज्ञाच्‍या वेळी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या दोघी सूक्ष्मातून वाईट शक्‍तींशी लढून त्‍यांना रोखत आहेत, त्‍यांना हरवत आहेत’, अशी दृश्‍ये मला दिसायची; पण ब्रह्मोत्‍सवाच्‍या निमित्ताने झालेल्‍या यज्ञाच्‍या वेळी सूक्ष्मातून युद्ध चालू असले, तरी ते मला दृश्‍य स्‍वरूपात दिसत नव्‍हते. या युद्धाचे स्‍वरूप फार निराळे होते. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति  (सौ.) गाडगीळ यांच्‍या समवेत प्रत्‍यक्ष सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यज्ञस्‍थळी उपस्‍थित होते आणि ‘त्‍यांच्‍या केवळ अस्‍तित्‍वामुळेच यज्ञातील सगळे अडथळे दूर होऊन त्‍या यज्ञातून पूर्ण ब्रह्मांडामध्‍ये पुष्‍कळ मोठी शक्‍ती कार्यरत होऊन सगळी विघ्‍ने दूर होत आहेत’, असे मला जाणवलेे. मला यज्ञातील ज्‍वाळा पुष्‍कळ प्रखर आणि तेजस्‍वी दिसत होत्‍या. ‘यज्ञाचे चैतन्‍य पुष्‍कळ पटींनी कार्यरत होऊन तेे संपूर्ण जगामध्‍ये प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले.

२. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ यांनी मुकुट परिधान केला असून साधकांच्‍या ठिकाणीही देवताच दिसणे

‘यज्ञाच्‍या वेळी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ यांनी मुकुट परिधान केला असून यज्ञमंडपामध्‍ये बसलेल्‍या साधकांच्‍या ठिकाणीही देवताच बसल्‍या आहेत. त्‍या देवता यज्ञाचा लाभ घेत आहेत’, असे दृश्‍य मला दिसत होते.’

– सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर, ठाणे सेवाकेंद्र (१६.५.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार सद्गुरुंच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक