मनसे सैनिकांनी चेतावणी दिल्यानंतर महामार्ग कार्यालयाला आली जाग
चिपळूण – येथील बहादूरशेख नाक्यात होत असणार्या वाहतूककोंडीचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही, अशी चेतावणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसेचे) वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष राजू खेतले आणि मनसे सैनिकांनी महामार्ग विभागाच्या प्रशासकीय अधिकार्यांना दिली. ही चेतावणी दिल्यानंतर महामार्ग विभागाकडून तात्काळ कार्यवाही चालू झाल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघण्यास साहाय्य होणार आहे.
शहरात महामार्ग चौपदरीकरणाचे काम चालू आहे. या कामामुळे मागील ३ मास बहादूरशेख येथे सकाळी आणि संध्याकाळी वाहतूक कोंडी होत आहे. बहादूरशेख नाक्यातून खेडकडे जाण्यासाठी केवळ १ गाडी जाईल, असा मार्ग ठेवण्यात आला आहे, तर उर्वरित म्हणजेच रस्त्याच्या बाजूला ठेकेदार आस्थापनाने अडथळे (बॅरिकेड) लावून ठेवले आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी काम चालू नाही, तरीही केवळ एकच गाडी जाईल, अशा पद्धतीने वाहतूक चालू ठेवल्याने येथे गाड्यांच्या रांगाच रांगा लागत आहेत. प्रशासनाच्या केवळ आडमुठे धोरणामुळेच वाहनचालक आणि जनतेला वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास सोसावा लागत आहे.
त्यामुळे मनसेचे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष राजू खेतले, तालुकाध्यक्ष अभिनव भुरण, रत्नागिरी जिल्हा संपर्क अध्यक्ष सहकार संघटक संतोष कदम, वाहतूक सेना तालुकाध्यक्ष मिलिंद कदम, प्रशांत हटकर, संघर्ष समिती सदस्य मंगेश महाडिक, रूपेश शेट्टे आदी पदाधिकार्यांसह मनसे सैनिकांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयावर धडक दिली.
या वेळी संबंधित अधिकारी हे मंत्र्यांच्या दौर्यात सहभागी झाले होते, तर उपस्थित अधिकार्यांना योग्य उत्तर देता येत नव्हते. यामुळे मनसे सैनिक आक्रमक झाले. आक्रमक भूमिका घेताच संबंधित अधिकार्यांनी पहाणी करून तात्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले; मात्र त्यावर न थांबता संबंधित अधिकारी, ठेकेदार यांना घेऊन अनावश्यक असणारे बॅरिकेड काढण्यात आले. एकेरी मार्गाऐवजी आता तात्पुरत्या स्वरूपात दुहेरी मार्ग चालू करून वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्याचे काम चालू करण्यात आले.
संपादकीय भूमिका‘नाक दाबल्यावर तोंड उघडते’, या म्हणीची आठवण करून देणारे महामार्ग प्रशासन ! |