|
(वस्त्रसंहिता म्हणजे मंदिरात प्रवेश करतांना परिधान करायच्या कपड्यांच्या संदर्भातील नियमावली)
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री छगन भुजबळ यांनी महाराष्ट्रातील विविध मंदिरांनी लागू केलेल्या वस्त्रसंहितेवर टीका करतांना ‘मंदिरातील पुजारी उघडेबंब असतात. त्यांना पूर्ण कपडे घालण्यास सांगा’, अशी हिंदु धर्माप्रती द्वेष दर्शवणारी टीका केली. त्याचा हिंदु जनजागृती समिती तीव्र निषेध करते. धर्मशास्त्रानुसार सोवळे-उपरणे घालून पूजा-अर्चा केली जाते, ही साधी गोष्ट भुजबळ यांना माहिती नाही आणि इतरांना (हिंदूंना) ‘मूर्ख’ म्हणण्याचे त्यांचे धाडस होते. पुजार्यांना ‘उघडेबंब’ म्हणत हिणवण्याचे धाडस होते. मक्केतील ‘काबा’चे दर्शन घेण्यासाठी जाणारे सर्व मुसलमान पुरुष ‘पुजार्यांप्रमाणेच’ कमरेच्या वर वस्त्रे घालत नाहीत, त्यांना ‘अर्धनग्न’ म्हणण्याचे धाडस भुजबळ यांच्यात आहे का ?
मुसलमान महिलांची इच्छा असो वा नसो, त्यांच्यावर बुरख्याची सक्ती केली जाते, याला ‘मूर्खपणा’ म्हणण्याचे धाडस छगन भुजबळ, पुरोगामी आणि ब्रिगेडी मंडळी दाखवतील का ? असा परखड प्रश्न हिंदु जनजागृती समितीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला.
समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे,
१. पुजार्यांच्या पेहरावावर आक्षेप घेणारे लोक ‘हिजाब’चे समर्थन करतात आणि मंदिरांतील वस्रसंहितेवर टीका करतात, हा तथाकथित पुरोगाम्यांचा दुतोंडीपणा आहे.
२. पोलिसांचा खाकी गणवेश, डॉक्टरांचा पांढरा कोट, अधिवक्त्यांचा काळा कोट, हे धर्मनिरपेक्ष शासनाने योजलेले ‘ड्रेसकोड’ चालतात.
३. स्वत: भुजबळ हे उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात मंत्री असतांना राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांत ‘वस्त्रसंहिता’ लागू केली होती. त्यानुसार अधिकारी आणि कर्मचारी यांना जीन्स-पँट, टी-शर्ट, भडक रंगांचे वा नक्षीकाम असलेले वस्त्र, तसेच स्लीपर न वापरण्याचा, तसेच केवळ शोभनीय वस्त्रे घालण्याचा नियम केला होता; मात्र मंदिरांत केवळ संस्कृतीप्रधान वस्त्र घालण्याचे आवाहन केलेलेही त्यांना चालत नाही. हा भारतीय संस्कृतीद्वेषच आहे. अशी भारतीय संस्कृतीविरोधी भूमिका घेणार्यांना येत्या काळात जनता धडा शिकवेल.
४. लहान मुलांनी ‘हाफ पँट’ घालून मंदिरात जायचे नाही का ?, हा भुजबळांचा प्रश्नच मुळात बालीश आहे. लहान मुलांच्या दृष्टीने ‘हाफ पँट’ घालू नये, असे कुठेही म्हटलेले नसतांना ते हेतूतः समाजाची दिशाभूल करत आहेत.
५. मंदिरांत शोभनीय आणि सात्त्विक वस्त्रे परिधान घालण्याच्या या मोहिमेला समाजातूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. मंदिरे हा धार्मिक विषय आहे, यामध्ये राजकारण्यांनी लुडबूड करू नये.
सविस्तर वृत्त वाचा –
♦ (म्हणे) ‘मंदिरांत वस्त्रसंहिता लागू करणे, हा मूर्खपणा !’ – राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ
https://sanatanprabhat.org/marathi/687083.html