सिंधुदुर्ग : रेडी येथे फलकावरील महिलांच्या छायाचित्रावर अश्‍लील लिखाण करून विटंबना करणार्‍या ५ जणांना अटक !

स्वयंभू द्विभूज श्री गणपति मंदिरातील संप्रोक्षण कलशारोहण सोहळा

वेंगुर्ला – रेडी येथील स्वयंभू द्विभूज श्री गणपति मंदिरात २६ ते २८ मार्च या कालावधीत संप्रोक्षण कलशारोहण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला येणार्‍या भाविकांचे स्वागत करण्यासाठी आणि कार्यक्रमानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी अखिल भारतीय भंडारी महासंघ, भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था आणि एल्.बी.एन्. (LBN) न्यूज यांच्या वतीने म्हारतळे येथे हा फलक लावण्यात आला होता. या फलकावरील (फ्लेक्सवरील) महिलांच्या छायाचित्रांवर अश्‍लील लिखाण करून, तसेच फलक फाडून विटंबना करण्यात आली. या गंभीर आणि किळसवाण्या प्रकाराच्या विरोधात अखिल भारतीय भंडारी महासंघ, भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था आणि एल्.बी.एन्. (LBN) न्यूज यांनी येथील पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. यानुसार केलेल्या चौकशीनंतर पोलिसांनी ५ जणांवर गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये स्वप्नील विजय राणे, चंद्रकांत यशवंत राणे, तुकाराम प्रल्हाद सावंत, राहुल लक्ष्मीकांत राणे आणि देवेश दशरथ राणे यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यासाठी वापरलेल्या २ दुचाकी कह्यात घेतल्याचे पोलीस उपनिरीक्षक दाभोळकर सांगितले.

भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेचे कोकण विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजन रेडकर

महिलांची अपकीर्ती केल्याच्या प्रकरणी महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे, अशी माहिती भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेचे राजन रेडकर यांनी दिली.

संपादकीय भूमिका

धर्मशिक्षणाअभावी समाजाचे होत असलेले नैतिक अधःपतन !