शिरगाव, डिचोली येथे वीर सावरकर जयंती साजरी
डिचोली, २९ मे (वार्ता.) – हिंदूंनी धर्माला महत्त्व देऊन धर्मशिक्षण घेतले पाहिजे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. गोविंद चोडणकर यांनी केले आहे. वीर सावरकर युवा मंच आणि हिंदू एकता समिती यांच्या संंयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीच्या कार्यक्रमात माझा देश माझे कर्तव्य या विषयावर ते बोलत होते. या वेळी सिद्धिविनायक मंदिराचे अध्यक्ष देवीदास जांभळे, वीर सावरकर युवा मंचचे अध्यक्ष रामकृष्ण दळवी आणि पदाधिकारी डॉ. गौरेश गांजेकर व्यासपिठावर उपस्थित होते.
श्री. गोविंद चोडणकर पुढे म्हणाले, मातृभूमीसाठी मरण येणे म्हणजे जगणे आणि मातृभूमीविना जगणे म्हणजे मरणे, या तत्त्वाला धरून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांचे आयुष्य देशासाठी वेचले. अशा सावरकरांचा नुसता अभ्यास केला, तरी देशाप्रती आपली कोणती कर्तव्ये असतात, याची जाणीव आपल्याला होईल. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या १४० व्या जयंतीनिमित्त देशाच्या नवीन संसदेचे उद्घाटन होत आहे. याचाच अर्थ आजपासून गांधीवादाचा अस्त होत आहे आणि येणार्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांनुसार देश मार्गक्रमण करेल, याचा हा संकेत आहे. दुसर्या महायुद्धाच्या काळात सावरकरांनी हिंदूंना इंग्रजांच्या सैन्यात भरती होण्याचा समादेश दिला होता. हिंदूंचे सैनिकीकरण आणि राजकारणाचे हिंदूकरण करा, असा मंत्र त्यांनी त्याकाळी दिला होता. हा मंत्र आजही हिंदूंसाठी उपयोगी आहे. १०० वर्षांपूर्वी सावरकरांनी लिहिलेल्या हिंदुत्व या ग्रंथात हिंदूसंघटन का आवश्यक आहे ?, हे लिहून ठेवले आहे. त्यानुसार सध्याच्या काळात हिंदूंनी संघटित होऊन कार्य केले पाहिजे. लव्ह जिहाद, हलाल जिहाद अशांसारख्या हिंदूंवरील आघातांच्या विरोधात उपाययोजना म्हणजे हिंदूंनी संघटित होऊन आपली रणनीती ठरवली पाहिजे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सर्व समस्यांवर मूळ उपाय म्हणून हिंदूंनी धर्माला महत्त्व देऊन धर्मशिक्षण घेतले पाहिजे.
प्रवचनाच्या शेवटी हिंदु राष्ट्र निर्मितीविषयी शपथ घेण्यात आली. सावरकर जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात गावात मद्यालयावर बंदी आणण्याचा निर्णय घेणार्या वारखंड येथील सरपंच गौरी जोशलकर आणि इतर काही मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राघोबा पेडणेकर यांनी केले, तर संजय नाईक यांनी उपस्थितांचे आभार मानले. याखेरीज या वेळी शिरगाव येथील सुशिला सांस्कृतिक संस्थेकडून स्वातंत्र्यवीरा तुजसी कोटी वंदना हा संगीताचा कार्यक्रम झाला. मुख्य कार्यक्रमाच्या आधी या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांसाठी माझ्या स्वप्नातील भारत या विषयावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. यामधील विजेत्यांना नंतर मुख्य कार्यक्रमात बक्षिसे देण्यात आली.