अधिवक्ता रिना रिचर्ड यांच्या लढ्याला यश !
मुंबई – अधिवक्ता रिना रिचर्ड यांनी दिलेल्या न्यायालयीन लढ्यानंतर पोलिसांनी कांदिवली (पूर्व) येथील ठाकूर गाव परिसरातील मशिदीवरील भोंग्याला जून मासाची अनुमती नाकारली आहे. या प्रकरणात न्यायालयाने या मशिदीच्या ट्रस्टींनाही पक्षकार केले आहे. २९ मे या दिवशी मुंबई उच्च न्यायालयात या मशिदीवरील भोंग्याविषयी सुनावणी झाली.
या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने पोलिसांना नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. न्यायमूर्ती कुलकर्णी यांच्यापुढे ही सुनावणी झाली. भोंग्याच्या अनुमतीसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. अधिवक्ता रिना रिचर्ड यांच्या याचिकेमुळे पोलिसांनी भोंग्याला अनुमती नाकारली आहे. याचिकाकर्त्या अधिवक्ता रिना रिचर्ड म्हणाल्या की, ठाकूर गाव परिसर येथील मशीद ही खासगी मालमत्ता आहे. कायद्यानुसार खासगी जागेतील ध्वनीवर्धकाचा आवाज त्या वास्तूच्या संरक्षक भिंतीच्या बाहेर येता कामा नये. या नियमानुसार पोलिसांनी कारवाई करावी.