कर्नाटकातील ३४ मंत्र्यांपैकी १६ मंत्र्याविरुद्ध फौजदारी प्रकरणे नोंद !

कर्नाटकातील नवनिर्वाचित काँग्रेस सरकारचे मंत्रीमंडळ

बेंगळुरू (कर्नाटक) – राज्यातील नवनिर्वाचित काँग्रेस सरकारच्या मंत्रीमंडळातील ३४ मंत्र्यांपैकी १६ मंत्र्यांवर फौजादारी गुन्हे नोंद आहेत. काही जणांच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट करण्यात आले आहेत; परंतु कोणत्याही प्रकरणात निकाल आलेला नाही.

१. गुन्ह्यांमध्ये ४२ प्रकरणांसह बी. नागेंद्र अग्रस्थानी असून उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या विरुद्ध १९ प्रकरणे आहेत. नागेंद्र यांच्या विरुद्ध २१ प्रकरणांत लोकायुक्तांकडून चौकशी करण्यात येत आहे. केंद्रीय चौकशी आयोग ४ प्रकरणांत चौकशी करत असून सी.आय.डी. एका प्रकरणात चौकशी करत आहे. वर्ष १९५७ च्या खाणी आणि खनिज नियंत्रण अभिवृद्धी कायद्याच्या अंतर्गत नागेंद्र यांच्यावर प्रकरण प्रविष्ट करण्यात आले आहे. यासह उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्याविरुद्ध पुरावे नष्ट करणे, खोटी माहिती पुरवणे, लाच तसेच फसवणूक आदी गुन्हे नोंद आहेत.

२. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध लाच, अवैध सभा घेणे, अशी १३ प्रकरणे आहेत. जमीर अहमद खान यांच्याविरुद्ध हत्या, आक्रमण करणे,  बळाने महिलेला अवमानित करून मृत्यूला कारणीभूत असणे, फसवणूक, धमकी अशी ६ गंभीर प्रकरणे आहेत. प्रियांक खर्गे यांच्याविरुद्ध ९, ईश्‍वर खंड्रे ७, एम्.बी. पाटील ५, रामलिंग रेड्डी ४, गृहमंत्री डॉ. जी. परमेश्‍वर ३, एच्.के. पाटील २, डी. सुधाकर २, कृष्ण बैरेगौडा १, एन्.चेलुवरायस्वामी १ आणि के.एच्. मुनियप्पा १, अशी यांच्याविरुद्ध फौजदारी प्रकरणे आहेत.

संपादकीय भूमिका

देशातील बहुतेक राजकारण्यांविरुद्ध विविध प्रकारची गुन्हे नोंद आहेत. काही जण कारागृहातही आहेत. तेथूनही ते निवडणूक लढवत आहेत. ही स्थिती लोकशाहीला मारकच आहे !