राज्यातील भात पिकाच्या उत्पादनात वाढ, तर उसाच्या उत्पादनात घट !

भातशेती

मुंबई, २५ मे (वार्ता.) – वर्ष २०२२-२३ च्या तुलनेत राज्याच्या वर्ष २०२३-२४ च्या भातशेतीच्या क्षेत्रात २.३ लाख हेक्टर इतकी वाढ झाली असून उत्पादनात २१.१ मेट्रिक टन इतकी वाढ झाली आहे. राज्याच्या ऊस उत्पादनात मात्र मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी २० लाख मेट्रिक टन इतकी घट झाली आहे. राज्याच्या कृषी विभागाने राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढाव्याच्या पार्श्वभूमीवर पिकाचे उत्पादनक्षेत्र आणि उत्पादन यांचा आढावा घेतला आहे. यामध्ये पिकांच्या उत्पादनाची वरील स्थिती आढळून आली आहे.

भाताची उत्पादकता मागील वर्षाच्या तुलनेत १८.४ टक्क्यांनी वाढली आहे. उसाचे उत्पादनक्षेत्र न्यून झाले, तरी मागील वर्षीच्या तुलनेत ती ६.३ टक्क्यांनी वाढली आहे. भातपिकासह ज्वारीची उत्पादकता २०.६ टक्के, बाजरी ३.५ टक्के, नाचणी ४.४ टक्के आणि मक्याची उत्पादकता ०.१ टक्क्यांनी वाढली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत कापसाच्या उत्पादनक्षेत्रात १.४ लाख हेक्टर घट झाली आहे; मात्र कापसाची उत्पादकता मागील वर्षीच्या तुलनेत १.९ टक्के इतकी वाढली आहे. तूर, मूग, उडीद या तृणधान्यांचे उत्पादनक्षेत्र, उत्पादन आणि उत्पादकता यांमध्ये वाढ झाली आहे.