शिळे : विचार आणि अन्न !

प्रतिकात्मक छायाचित्र

शिळ्या अन्नाचा स्वयंपाकाशी जवळचा संबंध आहे. जेवणाचा अंदाज चुकणे, केलेला स्वयंपाक नावडता असणे, घरातील काही सदस्यांचे उपाहारगृहातून खाऊन येणे आदी अनेक कारणास्तव स्वयंपाक उरतो आणि दुसर्‍या दिवशी त्याला ‘शिळे अन्न’ असे म्हटले जाते. जिभेचे चोचले असणारे ते खातांना नाक मुरडतात. त्यामुळे घरातील इतरांना ते संपवावे लागते. शिळ्या अन्नाचा आणि विचारांचा काय संबंध ? असा प्रश्न पडल्याविना रहाणार नाही.

शेजारी, नातेवाईक, मित्र – मैत्रिणी आदी कधी एकत्र जमल्यावर, तर कधी भ्रमणभाषद्वारे संपर्क करून विशेषत: अनेक घरगुती विषयांवर चवीने चर्चा केली जाते. ती चर्चा करतांना वेळेचे भान रहात नाही. आमचे अमुक नातेवाईक धडभले नाहीत. ते कायम आम्हाला पाण्यातच पहातात. त्यांना चांगली अद्दल घडली पाहिजे, अमुक वर्षी ती मला असे बोलली होती, कुणाच्या घरात काय वाईट चालू आहे ?, कुणी काय नवीन वास्तू, वस्तू, दागिने घेतले आदी फुटकळ चर्चा म्हणजे शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रकार आहे. या फुटकळ विषयांवरील चर्चांची फलनिष्पत्ती शून्य असते; पण त्याच चिखलात लोळण्याची सवय झालेली असल्याने त्यात लोळणे हवेहवेसे वाटते आणि नाहक उठाठेवी करण्याची सवय अंतिम श्वासापर्यंत सुटत नाही. आजपर्यंत शिळ्या विचारांमुळे कुणाचेही भले झालेले नाही. असे विचार डोक्यात घुसळत राहिल्याने चांगले विचार कोणते ? हे ओळखण्याची आवड रहात नाही. परिणामी व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्थिर रहाते. या वाईट सवयीचा दुष्परिणाम दैनंदिन जीवनावर कधी, कसा होतो हे लक्षात येत नाही. ‘जित्याची खोड मेल्याविना जात नाही’,  हे वाक्य खरे करण्याचा जणू चंगच बांधल्याप्रमाणे स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवले जाते.

ज्याच्याविषयी मागून तिरस्काराने बोलले जाते, त्याच्याशी तोंडावर गोड बोलायचे; कारण काय ? तर उगाच वाकडीक कशाला ? असेही वर कोडगेपणे सांगितले जाते. याला ‘दोन दगडांवर पाय ठेवणे’, असे म्हणतात. याची परिणती स्वतःची हानी होण्यातच होत असते. म्हणजे ज्याच्याविषयी बोलले जाते, त्याचा विषय चर्चेला आल्यावर मनात क्रोध, असुया वेगाने वाढतात. त्याचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. हे लक्षात घेऊया. त्यामुळे शिळे विचार आणि अन्न दोन्हीही नकोच, हे महत्त्वाचे !

– श्री. जयेश राणे, भांडुप, मुंबई.