कु. मधुरा भोसले यांच्या भावानुसार त्यांच्या खोलीतील भगवान श्रीकृष्ण आणि शिव यांच्या चित्रांमध्ये दैवी पालट होऊन ती सजीव होणे !

१. साधिकेला आलेली तिच्या खोलीतील भगवान श्रीकृष्ण आणि शिव यांची चित्रे सजीव झाल्याची अनुभूती येणे

कु. मधुरा भोसले

२५ जानेवारी २०२३ पासून आतापर्यंत आश्रमातील माझ्या रहात्या खोलीतील देवघरात ठेवलेले श्रीकृष्णाचे सजीव आणि गडद झालेले चित्र अन् भिंतीवर लावलेले शिवाच्या चतुर्भुज रूपातील सजीव आणि जागृत झालेले चित्रात पुढील पालट जाणवतात. ‘जेव्हा माझ्या मनाची आनंदी स्थिती असते, तेव्हा या दोन्ही चित्रांत दैवी पालट होऊन चित्रांतील श्रीकृष्ण आणि शिव यांच्या मुखावरील मंद स्मितहास्यामध्ये वाढ होते’, असे मला स्थुलातून डोळे उघडे ठेवून दिसते. तसेच जेव्हा माझा आध्यात्मिक त्रास वाढतो, तेव्हा या दोन्ही चित्रांत पालट होऊन चित्रांतील श्रीकृष्ण आणि शिव यांच्या डोळ्यांतून अश्रूधारा वहातांना मला स्थुलातून डोळे उघडे ठेवून दिसतात.

२. साधिकेला देवतांच्या संदर्भात आलेल्या अनुभूतीचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांनी केलेले आध्यात्मिक विश्लेषण

कु. मधुरा भोसले यांच्या खोलीतील सजीव झालेली श्रीकृष्ण आणि शिव यांची चित्रेया संदर्भात सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांना विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘ तुमची श्रीकृष्ण आणि शिव यांच्याशी सूक्ष्मातून एकरूपता वाढत आहे. त्यामुळे बिंब-प्रतिबिंब या न्यायानुसार जेव्हा तुम्ही आनंदी असता, तेव्हा या दोन्ही देवांच्या चित्रांमध्ये ‘ते स्मितहास्य करत आहेत किंवा आनंदी आहेत’, असे तुम्हाला जाणवते. तसेच जेव्हा तुम्हाला त्रास किंवा दु:ख होते, तेव्हा या दोन्ही देवांच्या चित्रांमध्ये त्यांच्या डोळ्यांतून अश्रूधारा वहात आहेत’, असे तुम्हाला दिसते.’’

३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधिकेला स्वप्नदृष्टांत देऊन तिच्याशी संभाषण केल्यावर तिला देवतांच्या संदर्भात आलेल्या अनुभूतीचे आध्यात्मिक विश्लेषण

११.५.२०२३ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘ब्रह्मोत्सव’ होता. हा ब्रह्मोत्सव पाहिल्यावर जेव्हा मी रात्री झोपले, तेव्हा माझ्या स्वप्नात  सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आले. मी त्यांच्या चरणांवर नतमस्तक होऊन त्यांना शरणागतभावाने नमस्कार केला. त्यानंतर वरील अनुभूतीचे विश्लेषण करतांना स्वप्नात आमच्यामध्ये पुढील संभाषण झाले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : तुझ्या आंतरिक साधनेमुळे तू श्रीकृष्ण आणि शिव या देवतांच्या तत्त्वाशी काही काळ एकरूप होतेस. त्यामुळे तुला त्यांच्या संदर्भात वरील अनुभूती येते. याला ‘तात्कालिक सायुज्य मुक्ती मिळणे’, असे म्हणतात. जसजशी तुझी साधना वाढत जाईल, तशी तुला देवतांशी अधिक काळ एकरूप झाल्याची, म्हणजे सायुज्य मुक्ती मिळाल्याची दीर्घकालीन अनुभूती येईल. त्यानंतर तुझी वाटचाल मोक्षाकडे चालू होईल.

मधुरा : ‘सायुज्य मुक्ती मिळणे’, म्हणजे देवतेच्या सगुण रूपाशी एकरूप होणे आणि ‘मोक्षप्राप्ती होणे’, म्हणजे देवतांच्या निर्गुण रूपाशी, म्हणजे ईश्वराशी एकरूप होणे’, असे आहे का ?

सच्चिदानंद परब्रह्म (डॉ.) आठवले : हो. अगदी बरोबर आहे.

कृतज्ञता !

‘हे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, आपल्या कृपाशीर्वादामुळेच मला सायुज्य मुक्ती आणि मोक्ष यांची प्राप्ती काही वर्षांनी होणार आहे’, यासाठी मी आपल्या पावन चरणी कोटीश: कृतज्ञ आहे. त्यामुळे मला स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रचलेल्या गीतातील पुढील ओळी आठवल्या ‘मोक्ष मुक्ती ही तुझीच रूपे, तुलाच वेदांती । ’ हे गुरुदेवा, माझ्या अंतर्मनातील भावसुमनांची ही भावांजली आपल्या चरणी संपूर्ण समर्पित आणि कृतज्ञता भावाने अर्पण करत आहे. आपण माझी ही भावसुमनांजली स्वीकारून माझ्यावर कृपा करावी’, अशी आपल्या श्रीचरणी विनम्र प्रार्थना आहे.

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.५.२०२३)

श्रीकृष्ण आणि शिव यांच्या चित्रांची सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना आलेली अनुभूती

कु. मधुरा भोसले :  दैवी पालट झालेले श्रीकृष्ण आणि शिव यांच्या चित्रांची २ छायाचित्रे जोडली आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : दोन्ही चित्रे सजीव झाल्यामुळे त्यांच्याकडे पाहिल्यावर छातीत आनंद जाणवतो. मधुराच्या भावामुळे दोन्ही चित्रे सजीव झाली आहेत.

•    सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

•    सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.

•    या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक