मुंबई – काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते आशिष देशमुख यांची २४ मे या दिवशी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. आशिष देशमुख यांचे काँग्रेस पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व ६ वर्षांसाठी रहित करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी याविषयीचा आदेश दिला.
याविषयी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘‘महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या शिस्तपालन समितीने ५ मार्च या दिवशी आशिष देशमुख यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवली होती. त्यावर त्यांनी पाठवलेल्या उत्तरावर चर्चा झाली; मात्र त्यांचे उत्तर समितीला समाधानकारक वाटले नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.’’