अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना ठार मारण्याच्या उद्देशाने धमकावणार्‍या भारतीय वंशाच्या युवकाला अटक !

थेट ‘व्हाईट हाऊस’च्या संरक्षणात्मक अडथळ्यांवर (‘सेक्युरिटी बॅरिअर्स’वर) चढवला ट्रक !

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना एका भारतीय वंशाच्या अमेरिकी युवकाने जिवे मारण्याची धमकी दिली आहे. साई वर्षित कंदुला असे या १९ वर्षीय युवकाचे नाव असून त्याने थेट एक ट्रकच व्हाईट हाऊसच्या संरक्षणात्मक अडथळ्यांवर (‘सेक्युरिटी बॅरिअर्स’वर) चढवला. युवकाला व्हाईट हाऊस पोलिसांनी अटक केली असून त्याच्या ट्रकमधून नाझी ध्वज हस्तगत करण्यात आला आहे.

या युवकाची सखोल चौकशी चालू करण्यात आली आहे. या युवकाचा कोणत्या संघटनेशी संबंध आहे का, याचा तपासही केला जात आहे. घटना २२ मेच्या रात्री १० वाजता घडल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. त्याने या घटनेचे चित्रीकरणही केले.