सोनसोडो येथे प्रतिदिन १५ मेट्रीक टन कचर्‍याची विल्हेवाट लावणारा प्रकल्प उभारणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोवा

सोनसोडो येथील कचर्‍याची विल्हेवाट लावणारा प्रकल्प

मडगाव, २२ मे (वार्ता.) – कचरा व्यवस्थापनाविषयी समस्या सोडवण्यासाठी सोनसोडो येथे प्रतिदिन १५ मेट्रीक टन कचर्‍याची विल्हेवाट लावू शकणारा प्रकल्प पुढील एका वर्षात उभारणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. सोनसोडो प्रकल्पासंबंधी स्थापन केलेल्या उच्चाधिकार (हाय पावर) समितीच्या बैठकीनंतर ते बोलत होते. २ वर्षांच्या कालावधीनंतर २२ मे या दिवशी उच्चाधिकार समितीची बैठक झाली.

या बैठकीनंतर मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘मडगाव आणि आसपासच्या परिसरातून प्रतिदिन ५० टन कचरा सिद्ध होतो. यामध्ये ३५ टन ओला कचरा असतो, तर १५ टन सुका कचरा असतो. (प्रतिदिन एकूण ३५ टन ओल्या कचर्‍यापैकी प्रशासन प्रतिदिन १५ टन कचर्‍यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारणार, तर प्रतिदिन २० टन ओला कचरा साठत रहाणार. त्याचे काय नियोजन केले आहे ? – संपादक) १५ मेट्रीक टन क्षमतेचा हा प्रकल्प उभारण्यासाठीचा निधी मडगाव नगरपालिका देणार असून त्यावर नगरपालिकेचे नियंत्रण रहाणार आहे. यासाठी लागणारे तांत्रिक साहाय्य गोवा घनकचरा व्यवस्थापन मंडळ आणि गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून मिळणार आहे.

या प्रकल्पाच्या कार्यवाहीवर ही दोन्ही मंडळे निरीक्षण करतील. मडगाव नगरपालिका गोवा घनकचरा व्यवस्थापन मंडळाकडे पैसा जमा करेल आणि यासंबंधीची निविदा गोवा घनकचरा व्यवस्थापन मंडळ काढेल. हा प्रकल्प व्यवस्थितरित्या कार्यरत झाल्यानंतर सध्या मडगावहून साळगाव येथील कचरा विल्हेवाट प्रकल्पात प्रक्रिया करण्यासाठी नेल्या जाणार्‍या १० टन
कचर्‍यावर सोनसोडो येथेच प्रक्रिया करण्यात येईल.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कचरा प्रकल्पासाठी पायाभूत सुविधा ३० जूनपर्यंत सिद्ध केल्या जातील ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मडगाव नगरपालिकेकडून लिचेट टँक सिद्ध करणे, शेड बांधणे, रस्ता बनवणे, आधारासाठी भिंत उभारणे आदी पायाभूत सुविधा ३० जूनपर्यंत सिद्ध केल्या जातील. सध्या सोनसोडो कचरा प्रकल्पाच्या व्यवस्थापनावर उच्च न्यायालय जातीने लक्ष देत आहे. (न्यायालयाला यात लक्ष घालावे लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! – संपादक)

(सौजन्य : Prudent Media Goa) 

उच्चाधिकार समितीच्या नियमित बैठका घेतल्या जातील ! – विश्वजित राणे

या बैठकीला उपस्थित असलेले मंत्री विश्वजित राणे म्हणाले, ‘‘सोनसोडो प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यात येईल. आजच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांच्या कार्यवाहीचा पाठपुरावा घेण्यासाठी उच्चाधिकार समितीच्या नियमित बैठका घेतल्या जातील.