श्रीराम-हनुमंत भेटीचा दिवस !

‘ज्येष्ठ शुक्ल प्रतिपदा या दिवशी पंपा सरोवराच्या काठी प्रभु रामचंद्र आणि हनुमंत यांची भेट झाली.

मतंग ऋषींच्या आश्रमातील शबरीचा पाहुणचार स्वीकारून रामचंद्र पंपा सरोवराच्या तिरी आले. सरोवराची शोभा पाहून श्रीरामांना पुन्हा सीतेची स्मृती झाली आणि त्यांनी विलाप केल्यावर लक्ष्मणाने त्यांना धीर दिला. राम-लक्ष्मण सरोवराच्या काठाने ऋष्यमुख पर्वताकडे येत असतांना त्यांना सुग्रीवाने पाहिले. वालीच्या भीतीने सुग्रीव या पर्वतावर दडून राहिला होता. हे वालीकडून तर कुणी आले नसावेत ना ? या शंकेने सुग्रीव भयभीत झाला. त्याने मारुतीला हे पडताळण्यास सांगितल्यावर हनुमंताने पर्वतावरून उड्डाण केले आणि कपिरूप सोडून भिक्षूच्या रूपाने तो राम-लक्ष्मण यांच्यापुढे येऊन ठाकला. राम-लक्ष्मण यांना त्याने वालीच्या दुर्वर्तनाची हकीकत सांगून सुग्रीवाशी सख्य करण्यास विनंती केली. लक्ष्मणाने आपली अयोध्यावियोगापासून सीताहरणापर्यंत सारा घटनाक्रम निवेदन केला. त्यांनीही सुग्रीवाच्या भेटीची इच्छा व्यक्त केल्यावर हनुमान मोठ्या प्रेमाने म्हणाला, ‘‘सुग्रीव सीतेच्या शाेधात आपणास अवश्य साहाय्य करील.’’

त्यानंतर स्वतःचे मूळ कपिरूप धारण करून राम-लक्ष्मण यांना आपल्या पाठीवर बसवून उड्डाण केले आणि ऋष्यमुख पर्वत ओलांडून मलय पर्वतावर आणून सोडले. तेथे त्याने त्यांची आणि सुग्रीवाची भेट घडवली. दोघांनाही पुष्कळ आनंद झाला. त्यांनी एकमेकांस प्रेमाने आलिंगन दिले. हनुमानाने याच वेळी काष्ठे आणून अग्नी प्रज्वलित केला आणि त्याला साक्ष ठेवून राम-सुग्रीवांचे सख्य कायम केले. त्यानंतर सीताहरणाच्या वेळी सीतेने काही दागिने भूमीवर टाकलेले होते, ते ओळखण्यास सुग्रीवाने रामापुढे ठेवले. ते अलंकार पाहून रामाच्या डोळ्यांत अश्रु जमा झाले. सीतेच्या चरणसेवेत मग्न असणार्‍या लक्ष्मणाने केवळ नूपुर ओळखून ‘हे दागिने सीतेचेच आहेत’, असा निर्वाळा दिला.’

(साभार : ‘दिनविशेष’ (भारतीय इतिहासाचे तिथीवार दर्शन))