गोव्यात ‘स्मार्ट सीसीटीव्ही कॅमेरे’ १ जूनपासून कार्यान्वित होणार ! – वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो

वाहतुकीचे उल्लंघन करणार्‍या वाहनधारकाला थेट भ्रमणभाषवर येणार ‘ई-चलन’

पणजी – ‘स्मार्ट सिटी’ योजनेचा एक भाग म्हणून पर्वरी आणि मेरशीसह पणजी अन् आसपासच्या भागांत वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यास ते टीपण्यासाठी ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम’च्या माध्यमातून कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित ‘स्मार्ट सीसीटीव्ही कॅमेरे’ बसवण्यात आले आहेत. हे कॅमेरे १ जूनपासून कार्यान्वित करण्यात येणार आहेत. ही यंत्रणा पूर्वी २३ मेपासून चालू होणार होती; परंतु ती आता १ जूनपासून कार्यान्वित केली जाणार आहे.

वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो

वाहतूक विभाग ‘सीसीटीव्ही कॅमेर्‍यां’द्वारे टीपलेल्या नियमांच्या उल्लंघनासाठी ‘ई-चलन’ काढणार आहे. हे ‘ई-चलन’ वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍याला थेट त्याच्या भ्रमणभाषवर पाठवले जाणार आहे, अशी माहिती वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो यांनी दिली. मंत्री गुदिन्हो पुढे म्हणाले, ‘‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम’विषयी नागरिकांना जागरूक करण्यासाठी सरकारने पुरेसा वेळ दिला आहे. आता ही प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी सिद्ध आहे; मात्र ‘सिग्नल’च्या आधी वाहने थांबण्यासाठी एक रेष काढायची आहे. हे काम लवकरच पूर्ण केले जाईल.’’