प्रेमविवाहामुळे घटस्फोट वाढले ! – सर्वोच्च न्यायालय

न्यायमूर्ती बी.आर्. गवई

नवी देहली – देशात घटस्फोटांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. यामागे प्रेमविवाह हे मुख्य कारण असल्याचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले. घटस्फोटाच्या एका प्रकरणाच्या संदर्भात १७ मे या दिवशी सर्वाेच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायमूर्ती बी.आर्. गवई आणि न्यायमूर्ती संजय करोल यांच्या खंडपिठासमोर वैवाहिक वादाशी संबंधित प्रकरण वर्ग करण्याच्या सूत्रावर सुनावणी होत असतांना संबंधित प्रकरण हे प्रेमविवाहाच्या संदर्भात असल्याने न्यायालयाने ही महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. न्यायालयाने म्हटले की, घटस्फोटाची अनेक प्रकरणे प्रेमविवाहामुळे झाल्याचे समोर आले आहे.

१. सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेत पती-पत्नीला मध्यस्थी करून वाद संपवण्यास सांगितले; मात्र पती-पत्नी दोघांनीही यासाठी नकार दिला. या वेळी न्यायाधिशांनी म्हटले की, विवाह म्हणजे समाधान आणि नि:स्वार्थ प्रेम असे नाते असते.

२. न्यायालयाने पुढे म्हटले की, घटस्फोट देतांना सर्व बाजूंनी विचार करावा लागतो. यामध्ये ‘पती-पत्नी दोघेही शेवटचे एकमेकांच्या सहवासात केव्हा आले होते ?’, ‘स्वत:च्या जोडीदाराविषयी आणि एकमेकांच्या कुटुंबियांविषयी त्यांनी काय आरोप केले आहेत ?’ आदी सर्व पहावे लागते.