रामनाथी (फोंडा) – सप्तर्षींच्या आज्ञेनुसार येथील सनातनच्या आश्रमात १२ मे २०२३ या दिवशी श्री भवानीदेवीच्या मंदिरात देवीच्या पादुकांची प्रतिष्ठापना भावपूर्ण वातावरणात करण्यात आली. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी देवीच्या पाषाणातील पादुकांची प्रतिष्ठापना केली. या वेळी सनातनचे संत आणि साधक उपस्थित होते.
याविषयी सप्तर्षींनी सांगितले होते की, जेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा ब्रह्मोत्सव गोव्यात साजरा होणार आहे, त्याच्या दुसर्या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात देवीच्या पादुकांची प्रतिष्ठापना करावी. सप्तर्षींच्या आज्ञेने ११ मे या दिवशी गोव्यात गुरुदेवांचा ब्रह्मोत्सव अत्यंत आनंदमय आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला. त्यानंतर दुसर्या दिवशी म्हणजे १२ मे या दिवशी देवीच्या पादुकांची प्रतिष्ठापना करण्यात आली. सनातन पुरोहित पाठशाळेच्या पुरोहित साधकांनी प्रतिष्ठापनेचे सर्व पूजाविधी मंत्रघोषात केले.
पादुका प्रतिष्ठापनेच्या वेळी श्री भवानीदेवीच्या पिंडिकेवर वाहिलेले कमळपुष्प खाली पडणे, ही मोठी दैवी प्रचीती असल्याचे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगणे(पिंडिका म्हणजे मूर्तीच्या खाली आसन म्हणून शिवपिंडीच्या शाळुंकेच्या आकाराप्रमाणे स्थापन केलेली शिळा) ‘देवीच्या पादुकांचा प्रतिष्ठापना विधी चालू असतांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी पादुकांवर अक्षता वाहिल्या. त्यानंतर काही क्षणांत श्री भवानीदेवीच्या पिंडिकेवर वाहिलेले उजव्या बाजूचे कमळाचे पुष्प आपोआप देवीच्या पादुकांच्या जवळ पडले. या वेळी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितले, ‘‘मी ऑक्टोबर २०२२ मध्ये आंबेजोगाई येथील श्री योगेश्वरीदेवीचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. तेव्हा अशाच प्रकारे देवीच्या उजव्या बाजूचे निळ्या रंगाचे कमळ खाली पडले होते.’’ ‘रामनाथी आश्रमात श्री भवानीदेवीच्या मूर्तीवरील कमळपुष्प पडणे, ही पुष्कळ मोठी दैवी प्रचिती आहे’, असेही श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितले.’ – श्री. सिद्धेश करंदीकर, सनातन पुरोहित पाठशाळा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.५.२०२३) |