रत्नागिरी – सी.एन्.जी. गाड्यांसमवेत आता रत्नागिरी विभागात ४ ठिकाणी इलेक्ट्रिक गाड्याही येणार आहेत. रत्नागिरीसाठी ३७, चिपळूण ३३, खेडला ३१ आणि दापोलीसाठी ३६, अशी १३७ गाड्यांची मागणी प्रस्तावित आहे. या गाड्यांसाठी ‘इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन’ची जागासुद्धा निश्चित करण्यात येत आहेत. पुढील ४ मासांत या गाड्या येथे येतील, अशी माहिती एस्.टी.चे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे पुढे म्हणाले की,
१. प्रदूषण टाळण्यासाठी एस्.टी.च्या गाड्या सी.एन्.जी. आणि इलेक्ट्रिकवर करण्यावर जास्त लक्ष दिले जात आहे. प्रवासी एस्.टी.कडे वळू लागले आहेत. त्यांच्याकरता अद्ययावत सोयीसुविधा देण्याकडे महामंडळाचे लक्ष आहे.
२. ‘लाल परी’ या सी.एन्.जी. वरील अप्रतिम गाड्याही रत्नागिरी एस्.टी. विभागात कार्यरत आहेत. पहिल्या टप्प्यातील ३० गाड्या रत्नागिरीत चालू असून लवकरच रत्नागिरी चिपळूणकरता एकूण १२० गाड्या मिळणार आहेत. एस्.टी.च्या सी.एन्.जी. वरील बसेससाठी माळनाका येथे एस्.टी.च्या आवारात सी.एन्.जी. पंप उभारण्यात आला आहे.
३.कोरोना कालावधीत एस्.टी. बंद होती. त्यामुळे झालेली हानी आता हळुहळू भरून निघत आहे. प्रवाशांना पुन्हा आकृष्ट करण्यासाठी नवनवीन सोयीसुविधा आणि अधिक आरामदायी गाड्यांची निर्मिती केली जात आहे. यामुळे एस्.टी.पासून दुरावलेला प्रवासी पुन्हा एस्.टी.ने प्रवास करील.
४. सध्या रत्नागिरी विभागात प्रतिदिन सव्वादोन लाख प्रवासी नियमित प्रवास करत आहेत.