कर्नाटकचे उदाहरण देऊन देश जिंकल्याचे सांगत आहेत ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई – कर्नाटकमधील पराभवानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे, ‘‘कर्नाटकात कोणतेच सरकार परत येत नाही. वर्ष २०१८ मध्ये भाजपच्या १०६ जागा निवडून येत ३६ टक्के मत मिळाली होती. आता भाजपला ३५.६ टक्के मते मिळाली आहेत. म्हणजे ०.४ टक्के मते, ४० जागा अल्प झाल्या आहेत. वर्ष २०१८ मध्ये काँग्रेसला ३८ टक्के, तर जे.डी.एस्.ला १८ टक्के मते मिळाली होती. जे.डी.एस्.ची ५ टक्के मते न्यून झाली आहेत. ही मते काँग्रेसला मिळाली आहेत. त्यामुळे काँग्रेसचा विजय झाला आहे. कर्नाटकचे उदाहरण देऊन देश जिंकल्याचे सांगत आहेत, त्यात कोणताही अर्थ नाही.’’

लोकसभा निवडणुकीत पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदीच दिसतील ! – अमृता फडणवीस

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा दारूण पराभव केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘‘कर्नाटकसारखे राज्य संधी देत आहे. काल आम्ही कर्नाटकमध्ये सत्तेत होतो, आज काँग्रेस आहे आणि उद्या आणखी कुणी असेल. कर्नाटक राज्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा लोकसभेत दिसतील. लोकसभा निवडणुकीवर याचा परिणाम होणार नाही. लोकसभेची निवडणूक एक स्वतंत्र निवडणूक आहे. लोकसभा निवडणुकीत पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदीच दिसतील, याचा सर्वांना विश्वास आहे.’’