गोवा : शिक्षण खात्याकडून नवीन विद्यालयांना मान्यता नाही

नवीन प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचे ८० अर्ज फेटाळले

पणजी, १४ मे (वार्ता.) – शिक्षण खात्याने वर्ष २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात आलेल्या नवीन शाळांना मान्यता दिलेली नाही. शिक्षण खात्याने नवीन ५४ प्राथमिक, २० माध्यमिक आणि ६ उच्च माध्यमिक विद्यालयांनी केलेले अर्ज फेटाळले आहेत.

एका बाजूने सरकारी शाळा बंद होत आहेत, तर नवीन खासगी शाळा उघडण्यासाठी अनेक अर्ज शिक्षण खात्याकडे येत आहेत. शिक्षण उपसंचालक आणि शिक्षण साहाय्यक भाग निरीक्षक यांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे शिक्षण खात्याने हे अर्ज फेटाळले आहेत. अर्ज आलेल्या परिसरातील इतर शिक्षण संस्थांनी नवीन शाळा चालू करण्यास हरकत घेतली आहे. नियमाप्रमाणे १ कि.मी. अंतराच्या आत दुसरी प्राथमिक शाळा असू नये, तसेच एखाद्या ठिकाणी माध्यमिक शाळा असेल, तर त्या ठिकाणी ३ कि.मी. अंतरापर्यंत दुसर्‍या माध्यमिक शाळेला अनुज्ञप्ती देता येत नाही. उच्च माध्यमिक विद्यालयांसाठी हे अंतर ८ कि.मी. आहे.