|
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना ९ मे या दिवशी इस्लामाबाद उच्च न्यायालयातून अटक करण्यात आली. इम्रान खान २ प्रकरणात जामिनासाठी उच्च न्यायालयात आले असतांना त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. त्यांना पाकिस्तानच्या निमलष्करी दलाने अटक केली. अटक करून नेतांना इम्रान खान यांना धक्काबुक्की करण्यात आली. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आमेर फारूक यांनी गृह मंत्रालयाचे सचिव आणि इस्लामाबादचे पोलीस प्रमुख यांना इम्रान खान यांना अटक केल्यानंतर १५ मिनिटांत न्यायालयात उपस्थित रहाण्याचा आदेश दिला. न्यायमूर्ती फारुख म्हणाले, ‘‘पोलीस प्रमुख न्यायालयात उपस्थित राहिले नाहीत, तर आम्ही पाकिस्तानच्या पंतप्रधानांना येथे बोलावू. या लोकांनी न्यायालयात येऊन सांगावे की, इम्रान यांना कोणत्या प्रकरणात आणि का अटक करण्यात आली ?’’ इम्रान खान यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थक यांनी इस्लामाबाद, लाहोर आदी शहरांमध्ये हिंसक आंदोलन चालू केले आहे.
सौजन्य वोहान
इम्रान खान यांना अल कादिर ट्रस्ट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. हा विद्यापिठाशी संबंधित खटला आहे. इम्रान खान पंतप्रधान असतांना त्यांनी या विद्यापिठाला कोट्यवधी रुपयांची भूमी अवैधरित्या दिली होती.