मध्यप्रदेशमध्ये बस नदीत कोसळल्याने २२ प्रवाशांचा मृत्यू  

खरगोन (मध्यप्रदेश) – येथे ९ मे या दिवशी सकाळी ८.४० च्या सुमारास एक खासगी बस पुलावरून नदीत कोसळल्याने २२ प्रवाशांचा मृत्यू झाला. यात ३ मुले आणि ९ महिला यांचा समावेश आहे. या अपघातात ३० जण घायाळ झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. पुलाचा कठडा तोडून ही बस नदीत कोसळली. ही नदी कोरडी होती. घटनास्थळी पोलीस आणि प्रशासन पोचण्यापूर्वीच डोंगरगाव आणि लोणारा गावच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि साहाय्यता कार्य चालू केले. त्यांनी घायाळांना स्वतःच्या वाहनांतून रुग्णालयात नेले. मध्यप्रदेश सरकारने या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाख रुपये घोषित केले आहे. गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या घटनेची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे.

१. पोलीस महानिरीक्षक राकेश गुप्ता यांच्या माहितीनुसार बस खरगोनच्या बेजापूरहून इंदूरच्या दिशेने जात होती. वेग अधिक असल्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बस पुलाचा कठडा तोडून थेट नदीत कोसळली.

२. उपजिल्हाधिकार्‍यांनी सांगितले की, बसचालकाचा पत्ता लागलेला नाही. प्राथमिक माहितीनुसार चालकाला डुलकी लागल्यामुळे बसवरील नियंत्रण सुटल्याचे दिसून येत आहे.