केंद्रशासनाने ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ अशा प्रकारची घोषणा करून अनेक वर्षे झाली आहेत. या घोषणेमागे मुलगी जन्माला येणार असल्यामुळे होणारा गर्भपात थांबवणे आणि त्या गर्भाला जन्माला घालून त्याला योग्य शिक्षण देणे, असे अभिप्रेत आहे. देशात पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या अल्प असल्याची माहिती वेळोवेळी प्रकाशित होत असते. गर्भपातामुळे देशात महिलांची संख्या पुरुषांच्या तुलनेत अल्प असल्याचे म्हटले जाते. स्त्रीला देवी मानणार्या देशात हे लज्जास्पद आहे. हा डाग पुसण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. याकडे सरकारने लक्ष देऊन उपाययोजना काढण्याचा प्रयत्न केला आहे; मात्र त्याही पुढे जाऊन हिंदूंच्या मुलींचे होणारे अपहरण, गायब होण्याचे प्रकार रोखण्यासाठीही आता कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे. एकट्या महाराष्ट्रामध्ये केवळ मार्च मासामध्येच २ सहस्र २०० मुली, तरुणी आणि महिला बेपत्ता झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. म्हणजे प्रतिदिन सरासरी ७० मुली बेपत्ता होत आहेत. ही एका राज्याची एका मासाची आकडेवारी आहे. जर संपूर्ण देशाची आकडेवारी काढली, तर ती किती असेल ?, याची कल्पना करता येत नाही. हे गंभीर प्रकरण आहे आणि त्याकडे तितक्याच गांभीर्याने पहाण्याची आवश्यकता आहे.
पोलिसांकडे या संदर्भात तक्रार प्रविष्ट झाल्यानंतर त्याचे अन्वेषण केल्यानंतरही यांतील १ सहस्र ६९५ मुलींचा शोध लागलेला नाही, हे आणखी गंभीर आहे. मुली किंवा कोणतीही व्यक्ती बेपत्ता होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. मुलींच्या बेपत्ता होण्यामागे अपहरण, घरातून पळून जाणे, प्रेम प्रकरण, निराशा, कौटुंबिक वाद आदी कारणे असू शकतात. देशात महिलांच्या समस्यांकडे लक्ष ठेवून त्या सोडवण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगांसह प्रत्येक राज्यात महिला आयोग, तसेच मानवाधिकार संघटना आहेत; मात्र तरीही अशा घटना थांबलेल्या नाहीत. महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी याविषयी म्हटले, ‘‘यासाठी खरेतर पुष्कळ मोठी यंत्रणा कार्यरत असणे आणि त्या यंत्रणेचा वापर केला जाणे आवश्यक आहे; पण तसे होतांना दिसत नाही. राज्य महिला आयोगाच्या वतीने गेल्या १६ मासांपासून आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. ज्या तक्रारी समोर येतात, त्या मुलींचा शोध लागलेला नाही, अशा आहेत. या मुली मानवी तस्करीत ओढल्या जातात. लग्नाचे आमीष, प्रेमाचे आमीष आणि नोकरीचे आमीष दाखवून या मुलींची दिशाभूल केली जाते अन् त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले जातात. ही गोष्ट अतिशय चिंताजनक आहे.’’ आता स्वतः महिला आयोगाच्या अध्यक्षाच असे म्हणत असतील, तर सरकार किती गंभीर आहे, हे लक्षात येते. ही स्थिती आजची किंवा कालची नाही, तर अनेक वर्षांची आहे. त्याकडे वर म्हटल्याप्रमाणे गांभीर्याने पाहिले गेलेले नाही. ‘याच प्रकरणांतून पुढे ‘द केरल स्टोरी’सारख्या घटना घडलेल्या आहेत’, हे कुणीही नाकारू शकत नाही. ‘हे वास्तव आहे’, असेही कुणी म्हणत असेल, तर ते चुकीचे ठरणार नाही. ‘द केरल स्टोरी’मध्ये ३२ सहस्र मुलींचे धर्मांतर झाल्याची आकडेवारी सांगण्यात आली आहे. यांतील किती बेपत्ता झाल्या, याची आकडेवारी नसली, तरी मुलींविषयी नेमके काय घडत आहे, याची कल्पना येते.
धर्मशिक्षण हवे !
मुली, तरुणी आणि महिला यांच्या बेपत्ता होण्याच्या कारणांचा शोध घेणे आवश्यक आहे. कौटुंबिक स्तरावरील कोणती समस्या होती की, ज्यामुळे एखादी मुलगी घर सोडून गेली, याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. ‘गरिबीमुळे मुली घर सोडून जात आहेत का ?’, हेही पहाणे आवश्यक आहे. तसेच अशा मुलींना कुणी पैशांचे किंवा नोकरीचे आमीष दाखवून पळवून नेत असेल आणि नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून वेश्याव्यवसायासाठी विकत असेल, हेही पहाणे आवश्यक आहे. देशात गेल्या काही वर्षांत ‘लव्ह जिहाद’च्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. अनेक राज्ये तर ‘लव्ह जिहाद अस्तित्वात आहे’, हेच मान्य करण्यास सिद्ध नाहीत. ‘द केरल स्टोरी’ला याच लोकांकडून विरोध केला जात आहे. ‘अशा मानसिकतेमुळे मुलींचा बळी जात आहे’, हे लक्षात घ्यायला पाहिजे. बेपत्ता मुलींची आकडेवारी नेहमीच समोर येत असते; मात्र ‘त्यावर उपाययोजना काढू’ किंवा निवडणुकीमध्ये या संदर्भात कोणता राजकीय पक्ष आश्वासन देऊन ‘तुमच्या मुली बेपत्ता होऊ देणार नाही’, असे सांगतांना आतापर्यंत दिसून आलेला नाही, हेही लक्षात घ्यायला हवे. याविषयी हिंदूंनी प्रत्येक राजकीय पक्षाकडून अन्न, वस्त्र, निवारा, नोकरी यांसह मुलींचे रक्षण करण्याचेही आश्वासन घेतले पाहिजे. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी या प्रकरणी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. ‘आपल्या विभागातील किती हिंदु मुली बेपत्ता झाल्या ?’, ‘त्यांची पार्श्वभूमी काय होती ?’, याची माहिती घेऊन पोलिसांच्या सहकार्याने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसेच सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केला पाहिजे. धर्मशिक्षणवर्गासह सामाजिक माध्यमांचा यासाठी वापर केला पाहिजे. ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाने देशातच नव्हे, तर जगभरात हिंदु आणि ख्रिस्ती तरुणींचा बुद्धीभेद करून त्यांचे धर्मांतर कसे केले जाते, हे जगाला दाखवून दिले आहे. अशाच माध्यमांचा वापर करून ‘हिंदूंना लहान लहान धार्मिक कृतींमागील हेतू, त्यांचे लाभ, महत्त्व सांगून ते करण्यास हिंदूंना कसे प्रोत्साहित करता येईल’, याचा विचार झाला पाहिजे. यातून कोणत्याही संकटात, मोहाला किंवा आमिषाला बळी न पडता धैर्याने आणि खंबीर राहून त्यावर मात करण्याचा त्यांच्यावर संस्कार होईल आणि त्या पलायनवादी होणार नाहीत किंवा त्यांचे अपहरण करण्याचे कुणाचे धाडस होणार नाही. ‘बेटी बचाव, बेटी पढाव’च्या पुढे जाऊन ‘बेटी की रक्षा’ हेही जोडणे आवश्यक आहे. केंद्र आणि प्रत्येक राज्य सरकार यांनी यासाठी विशेष मंत्रालय स्थापन करण्याचीच आता आवश्यकता आहे, इतके हे प्रकरण गंभीर झाले आहे. सरकार हा प्रयत्न करील, अशी अपेक्षा करूया.
हिंदु मुलींच्या बेपत्ता होण्याच्या घटना रोखण्यासाठी हिंदु संघटना आणि राजकीय पक्ष यांनी पुढाकार घ्यावा ! |