व्यष्टी साधनेविषयी
अ. देवाच्या चरणी शरणागतभाव ठेवण्याचे महत्त्व ! : साधकांनी ‘स्वतःकडून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया होत नाही’, असा विचार करत रहाण्यापेक्षा देवाशी अनुसंधानात रहाणे महत्त्वाचे आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले नेहमी म्हणतात, ‘‘देवाशी असलेले अनुसंधानाचे विचारच साधकाला मोक्षापर्यंत नेतात; म्हणून देवाच्या चरणी शरणागतभाव ठेवून प्रत्येक कृती करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.’’
आ. ‘प्रत्येक प्रसंगात समोरच्या व्यक्तीला छान (योग्य शब्दांत) उत्तर देणे’, ही साधना आहे. समोरच्या व्यक्तीला सुंदर उत्तर दिल्याने सगळीकडे आनंद पसरतो आणि त्यातूनही आपली साधना घडते.
इ. सेवेत असतांना आपल्या समोर घडत असलेला प्रसंग किंवा दृश्य यांच्याशी एकरूप होणे आणि त्यात ‘जलद गतीने मिसळून जाणे’, ही साधनाच आहे.
ई. ‘अयोग्य वेळी अयोग्य विचार करणे’, हीसुद्धा मायेतील वासना आहे. ‘वासना’ म्हणजे जेथे ईश्वराचा वास नाही ते.
उ. कोणत्याही प्रसंगात ‘मनाने स्वीकारणे, देवाला शरण जाणे आणि परिस्थितीला सामोरे जाणे’, हे अध्यात्मातील तीन गुण आत्मसात केल्यास मनातील प्रतिक्रियांचे प्रमाण न्यून होते.’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ