महाराष्‍ट्रातून मार्चमध्‍ये २ सहस्र २०० मुली बेपत्ता !

प्रतिदिन सरासरी ७० मुली बेपत्ता !

प्रतिकात्मक चित्र

अकोला – १८ ते २५ वर्षे वयोगटांतील तरुणी बेपत्ता होण्‍याचे राज्‍यातील प्रमाण धक्‍कादायक आहे. मार्चमध्‍ये २ सहस्र २०० मुली म्‍हणजे प्रतिदिन सरासरी ७० मुली बेपत्ता झाल्‍या आहेत. यात सर्वाधिक १८ ते २० वर्षे या वयोगटांतील मुली आहेत. फेब्रुवारीमध्‍ये १ सहस्र ८१० तरुणी बेपत्ता असल्‍याच्‍या तक्रारी होत्‍या. हे प्रमाण दुसर्‍याच मासात ३९० ने वाढले आहे.

मुली, तरुणी आणि महिला घर सोडून जाण्‍याचे प्रमाण अलीकडच्‍या काळात वाढले आहे. त्‍यातही प्रेमप्रकरणातून आमीषाला बळी पडून जाणार्‍या मुलींची संख्‍या अधिक आहे. बेपत्ता झालेल्‍या मुली जर अल्‍पवयीन असतील, तर पोलीस अपहरणाची नोंद करतात. मुली अल्‍पवयीन असल्‍याने त्‍यांची ओळख घोषित केली जात नाही. अशांची स्‍वतंत्र नोंद पोलिसांच्‍या संकेतस्‍थळावर नाही. सज्ञान मुली बेपत्ता झाल्‍याची नोंद मात्र पोलिसांच्‍या संकेतस्‍थळावर आहे. विशेष म्‍हणजे अल्‍पवयीन मुलींना पळवून नेऊन त्‍यांच्‍यावर लैंगिक अत्‍याचार झाल्‍यास अशा मुलींचा या आकडेवारीमध्‍ये समावेश नाही. याविषयी राज्‍य महिला आयोगाच्‍या अध्‍यक्षा सौ. रूपाली चाकणकर म्‍हणाल्‍या की, हे प्रमाण चिंताजनक असून ‘मिसिंग सेल’ने याविषयी कारणे शोधून उपाययोजना करण्‍याची आवश्‍यकता आहे.

वर्ष २०२३ मध्‍ये बेपत्ता झालेल्‍या मुलींचे प्रमाण…

पुणे, नाशिक, कोल्‍हापूर, ठाणे आणि नगर येथे सर्वाधिक प्रमाण !

शहरांच्‍या तुलनेत ग्रामीण भागांतून मुली बेपत्ता होण्‍याचे प्रमाण अधिक दिसून येते. मार्चमध्‍ये पुणे २२८, नाशिक १६१, कोल्‍हापूर ११४, ठाणे १३३, नगर १०१, जळगाव ८१, सांगली ८२, यवतमाळ जिल्‍ह्यांतून ७४ युवती बेपत्ता झाल्‍याची राज्‍यातील सर्वांत मोठी नोंद आहे, तर सर्वांत अल्‍प आकडेवारी हिंगोली ३, सिंधुदुर्ग ३, रत्नागिरी १२, नंदुरबार १४, भंडारा जिल्‍ह्यांतून १६ मुली बेपत्ता झाल्‍याची नोंद आहे.

मार्च २०२२ मधील १ सहस्र ६९५ मुली आजही बेपत्ता असल्‍याची नोंद !

पोलिसांच्‍या अन्‍वेषणात ज्‍या बेपत्ता मुली आणि महिला यांचा शोध घेतला जातो, तसतशी त्‍यांची नावे वगळण्‍यात येतात. आजही मार्च २०२२ मध्‍ये पोलिसांच्‍या दप्‍तरात (रेकॉर्डवर) १ सहस्र ६९५ मुली बेपत्ता आहेत. त्‍यांचा कागदोपत्री शोध चालूच आहे.

संपादकीय भूमिका :-

राज्‍यातून मुली आणि महिला बेपत्ता होण्‍याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असतांनाही सर्व सुविधा अन् यंत्रणा हाताशी असणारे पोलीस दल कार्यक्षमपणे त्‍यांचा शोध का घेत नाही ? मुली बेपत्ता होण्‍यामध्‍ये अकोला आणि अमरावती या जिल्‍ह्यांची स्‍थिती पुष्‍कळ गंभीर आहे. तरीही पोलीस आंधळेपणाने काम कसे करत आहेत ? या प्रकरणी पालकमंत्री आणि गृहमंत्री यांनी लक्ष घालून बेपत्ता मुली आणि महिला शोधून काढण्‍यासाठी प्रशासनाच्‍या कामावर लक्ष ठेवावे.