शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍यांवर गुन्हे नोंद करा ! – रवींद्र चव्हाण, पालकमंत्री, सिंधुदुर्ग

रवींद्र चव्हाण

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) – खरीप हंगामासाठी शेतकर्‍यांना वेळेत खते आणि बियाणे उपलब्ध होतील, याविषयी कृषी विभागाने दक्ष रहावे. सेंद्रीय खतांच्या नावाने माती विकणार्‍यांवर, तसेच बी-बियाण्यांमध्ये शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍यांवर गुन्हे नोंद करावेत, असे निर्देश पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री चव्हाण यांनी जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक घेतली. या बैठकीला आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांच्यासह अन्य उपस्थित होते.

शेतकर्‍यांची फसवणूक

पालकमंत्री चव्हाण या वेळी म्हणाले, ‘‘सेंद्रीय खतांच्या नावाखाली माती विकून शेतकर्‍यांची फसवणूक होत असल्याची प्रकरणे उघडकीस आणून देणार्‍यास सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेद्वारे बक्षीस दिले जाईल. फसवणूक करणार्‍यांची माहिती शेतकर्‍यांना व्हावी, यासाठी कृषी विभागाने एक ‘ॲप’ सिद्ध करून त्यावर सर्व माहिती उपलब्ध करावी. विमा आस्थापनांनी कृषी विभागाला अहवाल उपलब्ध करून द्यावा. जिल्ह्यातील तालुकानिहाय पर्जन्य, तसेच तापमान यांची माहिती प्रतिदिन शेतकर्‍यांसाठी उपलब्ध करून द्यावी.’’

जिल्ह्यामध्ये खते, बी-बियाणे यांचा दर्जा उच्चतम रहाण्यासाठी, तसेच गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरांवर एकूण ९ भरारी पथके आणि ९ तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत, असे या बैठकीत सांगण्यात आले.