सनातन संस्‍थेचे संस्‍थापक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या ८१ व्‍या जन्‍मोत्‍सवाच्‍या निमित्ताने…

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या जन्‍मोत्‍सवानिमित्त असलेला त्‍यांचा रथोत्‍सव पहातांना अनुभवलेले कृतज्ञतेचे भावक्षण !

‘२२.५.२०२२ या दिवशी महर्षींच्‍या आज्ञेने परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या ८० व्‍या जन्‍मोत्‍सवानिमित्त ‘रथोत्‍सव’ सोहळा होता. ‘रथोत्‍सवा’च्‍या वेळी त्‍यांच्‍या स्‍वागतासाठी रथ जाण्‍याच्‍या मार्गाच्‍या दोन्‍ही बाजूला रामनाथी आश्रमातील आणि गोवा राज्‍यातील सर्व साधक उभे होते. हा रथोत्‍सव पहातांना साधिकेने अनुभलेले कृतज्ञतेचे भावक्षण येथे देत आहोत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. रथोत्‍सवाच्‍या वेळी रथारूढ झालेल्‍या श्रीविष्‍णूच्‍या रूपातील परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांना पाहून भावजागृती होणे

रथारूढ झालेल्‍या श्रीविष्‍णूच्‍या रूपातील परात्‍पर गुरुदेवांना (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांना) पहातांना माझी भावजागृती झाली. अन्‍य वेळी मी त्‍यांना पाहिले होते; पण रथात सिंहासनावर विराजमान झालेल्‍या श्रीविष्‍णूच्‍या रूपातील परात्‍पर गुरुदेवांना पाहिल्‍यावर ‘हे प.पू. गुरुदेव वेगळेच आहेत’, असे वाटून मला त्‍यांच्‍याकडे पहातच रहावे’, असे वाटले.

कु. रूपाली कुलकर्णी

२. रथारूढ झालेल्‍या श्रीविष्‍णूच्‍या रूपातील परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांना पाहून ‘ते देव आहेत आणि त्‍यांच्‍या दर्शनामुळे साधकांच्‍या जीवनाचे सार्थक झाले’, असे वाटणे

वर्ष २०१५ पासून महर्षींच्‍या आज्ञेने आतापर्यंतच्‍या परात्‍पर गुरुदेवांच्‍या झालेल्‍या जन्‍मोत्‍सवांच्‍या वेळी त्‍यांनी कधी रामरूपात, तर कधी श्रीविष्‍णुरूपात साधकांना दर्शन दिले होते. तेव्‍हा मला विशेष काही वाटले नव्‍हते. ‘

प.पू. गुरुदेवांनी केवळ त्‍या रूपातील वेश धारण केला आहे’, असे मला वाटायचे; पण यंदा रथारूढ श्रीविष्‍णूच्‍या रूपातील परात्‍पर गुरुदेवांना पाहिल्‍यावर ‘ते देव आहेत. त्‍यांच्‍या केवळ दर्शनाने आम्‍हा सर्व साधकांच्‍या जीवनाचे सार्थक झालेे’, असे मला वाटले. मला ‘त्‍या स्‍थितीतून बाहेर येऊ नये’, असे वाटत होते.

३. श्री गुरूंच्‍या जन्‍मोत्‍सवाला शिष्‍य गुरूंना अर्पण देत असणे; पण आत्‍यंतिक थकवा असतांनाही परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनीच साधकांना त्‍यांच्‍या दर्शनाचा लाभ देऊन मोठी भेट देणे

एरव्‍ही शिष्‍य गुरूंसाठी सर्वस्‍वाचा त्‍याग करतात. ते श्री गुरूंच्‍या जन्‍मोत्‍सवाला त्‍यांना काहीतरी अर्पण करतात; पण ‘प.पू. गुरुदेव किती वेगळे आहेत ! साधकांना त्‍यांच्‍या दर्शनाचा लाभ व्‍हावा आणि त्‍यांचा उद्धार व्‍हावा’, यासाठी आत्‍यंतिक थकवा असतांनाही त्‍यांनी आम्‍हाला दर्शन दिले. (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांंची प्राणशक्‍ती पुष्‍कळ अल्‍प असल्‍याने ते त्‍यांच्‍या खोलीच्‍या बाहेर येत नाहीत. – संकलक) प.पू. गुरुदेव साधकांसाठी किती करत आहेत ! त्‍यांनी त्‍यांच्‍या जन्‍मोत्‍सवानिमित्त आम्‍हाला हे सुवर्णक्षण अनुभवायला देऊन ‘न भूतो न भविष्‍यति ।’, अशी भेट दिली.

अशा करुणामय आणि वात्‍सल्‍यमूर्ती असलेल्‍या गुरुमाऊलीच्‍या (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या) चरणी कृतज्ञतापूर्वक कोटीशः नमन ! ’

– कु. रूपाली कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.५.२०२२)


परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या ८० व्‍या जन्‍मोत्‍सवानिमित्त रथोत्‍सवापासून साधिकेला तिच्‍या हृदयमंदिरात त्‍यांचे ज्‍योतीस्‍वरूपातील अस्‍तित्‍व जाणवणे  

श्रीमती मनीषा गाडगीळ

१. नामजप करतांना ‘हृदयात एक ज्‍योत तेवत आहे’, असे जाणवणे, ‘जन्‍मोत्‍सव सोहळ्‍याचा आनंद असल्‍यामुळे ज्‍योत दिसत असावी’, असे वाटणे; परंतु नंतर नामजप करतांना आणि चालतांनाही ती ज्‍योत समवेत असल्‍याचे लक्षात येणे

‘१८.५.२०२२ या दिवशी सकाळी मी ‘निर्विचार’ हा नामजप करत होते. काही वेळाने ‘माझ्‍या हृदयात एक ज्‍योत तेवत आहे’, असे मला जाणवले. दुसर्‍या दिवशी, म्‍हणजे १९.५.२०२२ या दिवशीही नामजप करतांना मला तसेच जाणवले. तेव्‍हा माझे मन पुष्‍कळ शांत आणि स्‍थिर वाटत होते. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या ८० व्‍या जन्‍मोत्‍सव सोहळ्‍याची सिद्धता रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात चालू होती. ‘जन्‍मोत्‍सव सोहळ्‍याचा पुष्‍कळ आनंद असल्‍यामुळे ज्‍योत दिसत असावी’, असे मला वाटले; परंतु त्‍यानंतर मी प्रतिदिन नामजप करतांना किंवा काही वेळा चालतांनाही ‘ती ज्‍योत समवेत आहे’, असे माझ्‍या लक्षात येते. ‘ती ज्‍योत ३ – ४ दिवस अगदी मंदपणे तेवत आहे’, असे मला जाणवत होते.

२. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या रथोत्‍सवाच्‍या वेळी त्‍यांचे दर्शन झाल्‍यावर स्‍वतःच्‍या हृदयातील ज्‍योत मोठी झाल्‍याचे जाणवणे, तीनही गुरूंचे दर्शन झाल्‍यावर भावजागृती होणे आणि नंतर देहाची जाणीवच नसणे

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या ८० व्‍या जन्‍मोत्‍सव सोहळ्‍यानिमित्त महर्षींच्‍या आज्ञेने आयोजित केलेल्‍या रथोत्‍सवाच्‍या वेळी मला त्‍यांचे दर्शन झाले. त्‍या वेळी माझ्‍या हृदयात मंद तेवत असलेली ती ज्‍योत मोठी झाल्‍याचे मला जाणवले. परात्‍पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना पाहून माझी पुष्‍कळ भावजागृती झाली. याआधीही पुष्‍कळ वेळा माझी भावजागृती झाली आहे; परंतु या वेळी भावजागृती झाली, तेव्‍हा प्रारंभी ‘काय होत आहे ?’, हे मला कळलेच नाही. त्‍यानंतर मला माझ्‍या देहाची जाणीवच नव्‍हती.

३. जिना चढून वर येतांना ‘आपोआपच वर येत आहे’, असे जाणवणे आणि परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांची आठवण येऊन भावजागृती होणे

जिना चढून वर येतांना ‘मी आपोआपच वर येत आहे’, असे मला जाणवले. जिना चढतांना ‘मी रथोत्‍सव पहात आहे’, असे मला वाटत होते. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांची आठवण येऊन पुनःपुन्‍हा माझी भावजागृती होत होती. ‘विष्‍णुरूपात झालेले त्‍यांचे प्रत्‍यक्ष दर्शन हीच त्‍यांची केवढी मोठी कृपा आहे !’, असे वाटून माझे मन कृतज्ञतेने भरून येत होते.

४. या मंगलमय रथोत्‍सवानंतर ‘निर्विचार’ या नामजपात वाढ झाल्‍याचे माझ्‍या लक्षात आले. नामजप करतांना पुन्‍हा ‘हृदयात ज्‍योत मंदपणे तेवत असून देह पुष्‍कळ हलका झाला आहे’, असे मला जाणवते.

५. मला माझ्‍या हृदयात सतत परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचे अस्‍तित्‍व जाणवते आणि ‘ते मंद ज्‍योतीच्‍या रूपात सतत समवेत आहेत’, असे मला वाटते.

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनीच ही अनुभूती दिल्‍याबद्दल मी त्‍यांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता व्‍यक्‍त करते.’

– श्रीमती मनीषा गाडगीळ (वय ६१ वर्षे, आध्‍यात्मिक पातळी ६६ टक्‍के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(२६.५.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक