पिंपरी-चिंचवड शहरातील निम्‍म्‍यापेक्षा अधिक पोलीस ठाण्‍यांतील दूरभाष क्रमांक बंद !

पिंपरी (पुणे) – नागरिकांना साहाय्‍य मिळण्‍यासह इतर कामकाजासाठी पोलीस ठाण्‍यात दूरभाष क्रमांक उपलब्‍ध करून देण्‍यात आले आहेत; मात्र पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालयांतर्गत असलेल्‍या निम्‍म्‍यापेक्षा अधिक ठाण्‍यातील दूरभाष २० एप्रिल या दिवशी बंद स्‍थितीत असल्‍याचे समोर आले. ‘केवळ नियमांची पूर्ती करायची म्‍हणून दूरभाष क्रमांक घोषित केले जातात कि काय ?’ असा प्रश्‍न नागरिकांना पडत आहे.

सर्वच सरकारी कार्यालयांमधून कार्यालयाचे, वरिष्‍ठ अधिकारी यांचे संपर्क क्रमांक (दूरध्‍वनी क्रमांक) हे जनहितार्थ म्‍हणून समाजामध्‍ये प्रसिद्ध करण्‍यात येतात. कोणत्‍याही वेळी आपली तक्रार सांगण्‍यासाठी किंवा साहाय्‍य मागण्‍यासाठी हे संपर्क क्रमांक उपयोगी पडतात; परंतु काही पोलीस ठाण्‍यातील संपर्क क्रमांकावर संपर्क करण्‍याचा प्रयत्न केला असता हे दूरभाष क्रमांक बंद असल्‍याचे आढळून आले. यामध्‍ये आळंदी, भोसरी, देहूरोड, दिघी, पिंपरी, सांगवी, शिरगाव, तळेगाव एम्.आय डी.सी., वाकड हे दूरभाष क्रमांक बंद असल्‍याचे आढळून आले. तर चाकण, चिखली, निगडी, चिंचवड, तळेगाव दाभाडे येथील क्रमांक चालू आहेत.

संपादकीय भूमिका

पोलीस ठाण्‍यासारख्‍या महत्त्वाच्‍या विभागातील दूरभाष क्रमांक बंद असणे, म्‍हणजे जनतेला एकप्रकारे फसवण्‍याचाच प्रकार झाला. असे पोलीस खाते कायद्याचे राज्‍य देणार का ? वरिष्‍ठांनी यामध्‍ये लक्ष घालून जनतेला दिलेले क्रमांक चालू ठेवावेत, ही अपेक्षा !