कोल्हापूर, २२ एप्रिल (वार्ता.) – श्रीमद्जगदगुरु शंकराचार्य पीठाच्या आद्यशंकराचार्यांचा २ सहस्र ५३१ वा जयंती उत्सव ३० एप्रिल ते ५ मे या कालावधीत होत आहे. यात हवन, पूर्णाहुती, कीर्तन, प्रवचन यांसमवेत धर्माची पताका उंचावण्यासाठी हातभार लावणार्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येईल. ५ मे या दिवशी दुपारी १२ वाजता महाप्रसाद, पालखी प्रदक्षिणा सायंकाळी ५ वाजता भक्तांच्या उपस्थितीत आयोजित केली आहे, अशी माहिती करवीरपीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी कार्यवाह शिवस्वरूप भेंडे उपस्थित होते.
मठाच्या वतीने ८ पुरस्कार !
शंकराचार्य म्हणाले, ‘‘मठाच्या वतीने ८ पुरस्कार देण्यात येणार आहेत. यात वेदशास्त्र संपन्न मल्लारी विष्णु धर्माधिकारी यांच्या नावे असलेला ‘वैदिक’ पुरस्कार गोवा येथील सुशांत वासुदेव वझे, ‘श्रीपाद शास्त्री बंडोपंत जेरे-शास्त्री’ पुरस्कार रामटेक येथील मधुसुदन पेन्ना, ‘नरहरबुवा कराडकर-कीर्तनकार’ पुरस्कार ठाणे येथील अशोक गणेश उपाध्ये, ‘श्रीपाद सीताराम गोसावी-स्थानिक वैदिक’ पुरस्कार औदुंबर येथील प्रदीप जोशी, ‘विद्याशंकर भारती स्वामी-सामाजिक गौरव’ पुरस्कार बीड येथील आधुनिक वैद्य दिलीप देशमुख आणि आधुनिक वैद्य राजेंद्र वीर यांना तसेच ‘श्रीमती लक्ष्मीबाई आळतेकर-महिला कीर्तनकार’ पुरस्कार गोवा येथील वंदना प्रदीप जोशी, ‘वेद चुडामणी रंगनाथ आळतेकर-होतकरू विद्यार्थी’ पुरस्कार हा नांदेड येथील विश्वंभर कानशुक्ले आणि परभणी येथील प्रमोद कुलकर्णी यांना देण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप असेल.
पुरस्कार वितरण ४ मे या दिवशी सकाळी १० वाजता होईल. तरी आठवडाभर चालणार्या या कार्यक्रमांमध्ये भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन विद्यानृसिंह भारती स्वामी यांनी या वेळी केले.