कारसेवकांना जाळणार्‍या ८ दोषींना सर्वोच्च न्यायालायकडून जामीन

वर्ष २००२ च्या गुजरात दंगलीचे प्रकरण

फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्यांनाही जामीन !

नवी देहली – वर्ष २००२ च्या गुजरात दंगलीचा प्रारंभ साबरमती एक्सप्रेसच्या डब्याला आग लावून कारसेवकांना जिवंत जाळण्याने झाला. त्या घटनेतील दोषी असणार्‍या ८ धर्मांध मुसलमानांची सर्वोच्च न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे. यांतील काही जण जन्मठेपेची शिक्षा भोगत होते, तर काही जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या दोषींनी १७ ते २० वर्षे शिक्षा भोगली आहे. ४ दोषींची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

१. गुजरात दंगलीच्या प्रकरणी सत्र न्यायलयाने मार्च २०११ मध्ये ११ दोषींना फाशीची शिक्षा आणि २० जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. अन्य ६३ आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती.

२. फाशीच्या शिक्षेच्या विरोधात गुजरात उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्यावर वर्ष २०१७ मध्ये उच्च न्यायालयाने ११ जणांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत पालटली. त्यामुळे जन्मठेप भोगणार्‍यांची संख्या ३१ झाली. जन्मठेपेची शिक्षा भोगणार्‍या दोषींना जामीन मिळावा, याकरता वर्ष २०१८ मध्ये याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने जामीन देत निर्णय दिला.

जामिनासाठीचा निकष

जन्मठेप भोगत असलेल्या दोषींची १७ वर्षे शिक्षा भोगून झाली होती आणि त्यांच्या वर्तनात सुधारणा दिसत असल्याने, तसेच या प्रकरणी प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकांवर लवकर सुनावणी होण्याची शक्यता नसल्याने न्यायालयाने त्यांना जामीन दिला. जामीन देतांना अटी घालण्यात आल्या आहेत.