२०.४.२०२३ या दिवशी, म्हणजे चैत्र अमावास्येला श्रीमती अलका वाघमारे यांचा ६५ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची त्यांच्या मुलाला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
श्रीमती अलका वाघमारे यांना ६५ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !
१. गुणवैशिष्ट्ये
१ अ. प्रतिष्ठित शाळेची मुख्याध्यापिका असूनही त्याची लाज न बाळगता साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करणे
१. साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ प्रकाशित होऊ लागल्यावर त्याचे वितरण करण्यासाठी आई आणि मी शहरामध्ये जत्रा, बसस्थानक, प्रदर्शन इत्यादी निरनिराळ्या ठिकाणी जायचो. तेव्हा आई एका प्रतिष्ठित शाळेची मुख्याध्यापिका असूनही तिला वरील ठिकाणी साप्ताहिकाचे वितरण करण्यात कमीपणा वाटत नव्हता.
२. साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे एका प्रदर्शनीच्या ठिकाणी वितरण करत असतांना आईला मुख्याध्यापिका म्हणून ओळखणारे शाळेतील एका विद्यार्थ्याचे पालक आले. आईने त्यांना साप्ताहिक घेण्यासाठी विनंती केल्यावर ते पालक म्हणाले, ‘‘आप हेडमास्टर होके भी २ रुपये के लिए ये पेपर बेचते हो !’’ (तुम्ही मुख्याध्यापिका असूनही २ रुपयांसाठी हे साप्ताहिक विकता !’) आईने त्या व्यक्तीचे बोलणे शांतपणे ऐकले आणि तिला साधनेचे महत्त्व समजावून सांगितले. तेव्हा त्यांनी आनंदाने साप्ताहिक विकत घेतले. एकदा एका व्यक्तीने तिला म्हटले, ‘‘तुम्हाला शाळेचा पगार पुरत नाही; म्हणून हा ‘साईड बिझनेस’ करता का ?’’
३. मुख्याध्यापिका असूनही आईने शाळेतील काही शिक्षिका आणि काही विद्यार्थ्यांचे पालक यांना साप्ताहिकाचे वर्गणीदार केले होते. त्यांच्या अंकांचे वितरण करण्यासाठी ती स्वतःच जात असे.
१ आ. घरी चोरी झाल्याचे कळल्यावर ‘भगवंताने थोडक्यात निभावले’, अशी श्रद्धा असणे : ‘आम्ही साधना करू लागल्यावर एकदा आई शाळेत गेली होती आणि मी एका साधकाच्या घरी त्यांच्या साहाय्यासाठी गेलो होतो. दुपारी आई शाळेतून आली. तेव्हा तिला घराचे कुलुप तोडलेले दिसले. ती न घाबरता आत शिरली. तेव्हा कुणीतरी घराच्या मागच्या दरवाज्यातून बाहेर पडल्याची तिला चाहूल लागली. तिने ‘कोण आहे ?’, हे पहाण्याचा प्रयत्न केला; परंतु तिला कुणी दिसले नाही. ती घरात सर्वत्र फिरली. तेव्हा तिला कपाट फोडलेले आढळले. घरात चोरी झाल्याचे तिच्या लक्षात आले. तिने सर्व वस्तू तपासल्या. तेव्हा थोडी रोख रक्कम आणि १ सहस्र रुपये किमतीचे तोडे चोरी झाल्याचे तिच्या लक्षात आले. मी घरी परतल्यावर तिने मला याविषयी सांगितले आणि म्हणाली, ‘‘भगवंताच्या कृपेमुळे थोडक्यातच निभावले.’’
१ इ. निर्भयता आणि लढाऊ वृत्ती : आम्ही लहान असतांना आजोबा बाहेरगावी गेले असल्यास घरी आई आणि आम्ही दोन भावंडे असायचो. तेव्हा ती कधी घाबरायची नाही. रात्री झोपतांना ती नेहमी स्वतःसमवेत एक काठी ठेवायची. जेणेकरून काही प्रसंग ओढवल्यास स्वसंरक्षण करता यावे. मी अध्यात्मप्रसारासाठी दुसर्या शहरात गेलो होतो. तेव्हा ६ – ८ मास आणि नंतर मी पूर्णवेळ साधना करू लागल्यावर आई घरी एकटीच असायची. कुणी तिच्या साहाय्यासाठी नसायचे, तरी गुरूंवरील श्रद्धेमुळे तेवढे दिवस ती एकटीच घरी राहिली.
१ ई. गुरूंवरील दृढ श्रद्धा
१. आम्ही साधनेत आलो, तेव्हा आमची आर्थिक स्थिती तशी बेताचीच होती. घरामध्ये कमावती ती एकटीच असल्याने तिच्यावरच सर्व भार होता. मी साधनेला आरंभ केल्यावर प्रारंभी तिला वाटायचे, ‘मी (धैवतने) नोकरी करावी’; परंतु ती सत्संगाला जाऊ लागल्यावर तिने आम्हा दोघांकडूनही (मी आणि ताई) कधी ‘आम्ही पैसे मिळवण्यासाठी नोकरी करावी; व्यवसाय करावा’, अशी अपेक्षा केली नाही. ‘गुरु आहेत, ते काळजी घेणारच आहेत. मुलांनी साधनाच करावी’, असे तिला नेहमी वाटते.
२. सर्वसामान्य पालकांना ‘स्वत:च्या मुलांचा, विशेषतः मुलीचा विवाह व्हावा’, असे वाटते. आईच्या संदर्भात असे कधीच झाले नाही. ‘आवश्यकता असेल, तेव्हा गुरु करवून घेतील’, अशी श्रद्धा असल्याने तिला ‘मुलीचे कसे होईल ?’, अशी काळजी कधी वाटली नाही.
२. गुरुकृपेमुळे आलेल्या काही अनुभूती
२ अ. अध्यात्मप्रसारासाठी जातांना अचानक पाऊस येणे आणि सत्संगाला उशीर होऊ नये; म्हणून प्रवास चालू ठेवल्यावर पाऊस पुढे पुढे पडून गेल्याने न भिजता सत्संगाला पोचणे : आई हळूहळू अध्यात्मप्रसारार्थ आजूबाजूच्या गावांमध्येही जाऊ लागली. एकदा दुचाकीने प्रसारासाठी बाहेरगावी जात असतांना अचानक पाऊस आला. तिच्याजवळ छत्री किंवा ‘रेनकोट’ नव्हता. त्या वेळी सत्संगाला उशीर होऊ नये; म्हणून तिने पुढे जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा जसजशी ती पुढे जात होती, तसतसा पाऊस पुढे पडून गेलेला असल्याचे तिच्या लक्षात आले. त्यामुळे ती पावसात न भिजता सत्संगाला पोचली. ‘गुरूंनीच काळजी घेतली’, असे तिला वाटत होते.
२ आ. कुटुंबातील सदस्य वेगवेगळ्या ठिकाणी असतांना एकाच वेळी सर्वांचा अपघात होणे; परंतु गुरुकृपेनी सर्वांचे रक्षण होणे : वर्ष १९९९ मध्ये मी प्रसारासाठी महाबळेश्वर येथे होतो. तेथे दुचाकीने जात असतांना माझा अपघात झाला. मला डोक्याला दुखापत झाली. त्याविषयी मी आईला कळवले. तेव्हा तिने सांगितले, ‘त्याच दिवशी त्याच वेळी ती आणि ताई दोघींचाही सत्संग घेण्यासाठी जात असतांना अपघात झाला.’ याविषयी मी प्रसारसेवकांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘प्रारब्धानुसार तिघांचाही अपघात झाला; परंतु गुरुकृपेने तिघांचेही रक्षण झाले.’’
३. कृतज्ञता
श्रीगुरूंनी आम्हाला अशा आईच्या पोटी जन्माला घातले. ‘आईच मुलांची पहिली गुरु असते’, या उक्तीप्रमाणे आईच्या माध्यमातून आम्हा भावंडांवर चांगले संस्कार केले. आईच्या छत्रछायेखाली ठेवून आम्हाला कशाचीही उणीव भासू दिली नाही. यासाठी आम्ही आई आणि श्रीगुरु यांच्या चरणी कृतज्ञ आहोत.’
– श्री. धैवत विलास वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.३.२०२३)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |