न्यायालयात रिट याचिका प्रविष्ट !
मुंबई – सर्वोच्च आणि उच्च न्यायालय यांनी धार्मिक वास्तूंवरील अवैध भोंगे हटवण्याविषयी वेळोवेळी दिलेले निर्देश, तसेच काही मासांपूर्वी मशिदींवरील अवैध भोंग्यांच्या विरोधात मनसेने उभारलेले जनआंदोलन यानंतरही मुंबईतील अवैध भोंग्यांचा प्रश्न कायम आहे. वडाळा येथील ७० वर्षीय महेंद्र सप्रे यांनी अँटॉप हिल येथील मशिदीवरील अवैध भोंग्याच्या विरोधात एक रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयात प्रविष्ट केली आहे. १७ एप्रिल या दिवशी याविषयी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली.
महेंद्र सप्रे यांनी अधिवक्ता प्रेरक चौधरी यांद्वारे ही याचिका प्रविष्ट केली आहे. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपिठापुढे ही सुनावणी झाली. वडाळा येथील बंगालीपुरा झोपडपट्टीच्या परिसरात निर्धारित वेळेनंतर मोठ्या आवाजात भोंगे वाजवले जातात. याविषयी प्रशासनाने अनेकदा तक्रारी करूनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. माटुंगा (पूर्व) येथील शांतता क्षेत्र असलेल्या ‘इस्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी’ (आय्.सी.टी.) च्या परिसरातही ध्वनी प्रदूषणाविषयीच्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन केले जात नाही. मोठ्या आवाजातील भोंग्यांमुळे वृद्ध रहिवाशी, हृदयविकार आणि अन्य गंभीर व्याधी असलेले रुग्ण यांच्या जीवितेला धोका संभावत आहे. मुंबई पोलीस आणि महानगरपालिका प्रदूषण नियंत्रण रोखण्यात अपयशी ठरत आहेत. त्यामुळे अवैध भोंग्यांवर कारवाई करण्याचे निर्देश न्यायालयाने प्रशासनाला द्यावेेत, अशी विनंती सप्रे यांनी या याचिकेत केली आहे. या याचिकेवरील पुढील सुनावणी १२ जून या दिवशी होणार आहे.
संपादकीय भूमिकान्यायालयाच्या निर्णयानंतरही मशिदींवरील अवैध भोंगे हटवण्यासाठी याचिका प्रविष्ट करावी लागणे, हे संतापजनक ! |