बारामती (जिल्हा पुणे) – वसई-विरार येथील विजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये वातानुकूलित यंत्रामुळे अतीदक्षता विभागात २३ एप्रिल २०२१ या दिवशी लागलेल्या आगीमध्ये १९ रुग्णांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांनाच आता कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या प्रकरणी ग्राहक पंचायतीचे अधिवक्ता तुषार झेंडे यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली होती. आयोगाने जानेवारीमध्ये हे प्रकरण सुनावणीसाठी मुंबईत ठेवले होते. या वेळी नगरविकास विभागाचे सचिव आणि वसई-विरार महापालिकेचे आयुक्त उपस्थित होते. या वेळेस आयोगाला सादर केलल्या अहवालात मृतांच्या नातेवाइकांना ५ लाख रुपये, तर घायाळांना ५० सहस्र रुपयांची भरपाई दिल्याचे नमूद केले आहे.
आयोगाने सर्व वस्तूस्थिती आणि तक्रारदार यांचे म्हणणे विचारात घेता, यामध्ये शासकीय अधिकारी यांचा हलगर्जीपणा स्पष्टपणे दिसून येत असल्याचे मत नोंदवले आहे. यामध्ये हद्दीचे सूत्र उपस्थित करून राज्य सरकार स्वत:चे दायित्व झटकू शकत नाही. त्यामुळे सरकारी अधिकार्यांना दोषी धरून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई का करू नये ? असाही प्रश्न करण्यात आला आहे.