‘नोव्हेंबर २०२० मध्ये शेतीची कामे आणि आईचे वर्षश्राद्ध यांसाठी आमचे वेळवंड (भोर, जिल्हा पुणे) या आमच्या गावी जायचे ठरले. मी गावाला जायला निघण्यापूर्वी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी मला सांगितले, ‘‘गावी प्रत्येक कृती करतांना साधनेच्या अनुषंगाने विचार करायचा आहे.’’ त्यांच्या सांगण्याचा मला पुष्कळ लाभ झाला. गावी गेल्यावर मी व्यष्टी-समष्टी साधनेचे ठरवल्याप्रमाणे प्रयत्न केले. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. वर्षश्राद्धाच्या दिवशी कृती आणि भाव या स्तरांवर केलेले प्रयत्न
अ. आईच्या वर्षश्राद्धाच्या दिवशी सकाळी लवकर उठून मी भ्रमणभाषवर दत्तात्रेयांचा नामजप मोठ्या आवाजात लावला होता.
आ. ‘आईचा लिंगदेह पितृलोकातून पृथ्वीकडे येईल, तेव्हा त्या प्रवासात लिंगदेहाला कोणतेही अडथळे न येता तो प्रवास सहजतेने व्हावा’, यासाठी माझ्याकडून मधूनमधून प्रार्थना होत होत्या.
इ. आईचे छायाचित्र एका पटलावर ठेवून त्याची पूजा करायची होती. तेव्हा मी ‘प.पू. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) छायाचित्राची पूजा करत आहे’, असा भाव ठेवून पूर्ण पटल सजवले होते.
ई. श्राद्धविधीचा कार्यक्रम दुपारी १२ वाजेपर्यंत होता. त्या काळात माझी अंतर्मुखता वाढून माझ्याकडून साधनेचे सर्व प्रयत्न होत होते.
२. सुवासिनीची पाद्यपूजा करतांना ‘तेथे आईच बसली आहे’, असे वाटणे आणि नंतर ‘प्रत्यक्ष परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांवर अभिषेक करत आहे’, असे जाणवणे
एका सुवासिनीची पाद्यपूजा करून तिचे आशीर्वाद घ्यायचे होते. हा विधी करत असतांना मी सुवासिनीच्या चरणांवर पाणी अर्पण केले. तेव्हा तिथे ‘प्रत्यक्ष माझी आईच बसली आहे’, असे मला जाणवले. नंतर ‘मी प्रत्यक्ष गुरुमाऊलींच्या चरणांवर अभिषेक करत आहे’, असे मला जाणवले. मी ते जल तीर्थ म्हणून प्राशन केले. त्यानंतर ‘माझ्या आईचा पुढचा प्रवास चालू झाला’, असे मला जाणवले. तेव्हा माझा अष्टसात्त्विक भाव जागृत झाला. अशी स्थिती मी आतापर्यंत कधीही अनुभवलेली नव्हती. मी एक घंटा त्या स्थितीत होतो. देवाने मला ही मोठी अनुभूती दिली.
३. साधनेमुळे अनुभवलेली स्थिरता
अ. माझ्या चुलत बहिणी आईच्या आठवणीने रडत होत्या. तेव्हा मला सहजतेने त्यांना सांगता आले, ‘‘आईचा प्रवास आता पुढील लोकात चालू झाला आहे. आपण त्यात अडथळा आणायला नको. तुम्ही रडू नका.’’ असे सांगत असतांना माझ्यातील कोणत्याही भावना उफाळून आल्या नाहीत.
आ. आईच्या छायाचित्राकडे पाहिल्यावर माझ्या भावना उफाळून न येता ‘आई आता स्थूल देहाने नसली, तरी तिचे आशीर्वाद मला लाभत आहेत’, असे जाणवले.
सद्गुरु राजेंद्रदादांनी सांगितल्याप्रमाणे साधनेच्या अनुषंगाने प्रयत्न केल्यामुळे मला हे सर्व अनुभवता आले.
४. सुवासिनींना सनातनच्या सात्त्विक भेटवस्तू देण्याचा मनातील हेतू पूर्ण होणे
आईच्या श्राद्धविधीच्या निमित्ताने तेरा सुवासिनींना काही भेटवस्तू द्यायच्या होत्या. त्या वेळी ‘आध्यात्मिक दृष्टीने लाभ होईल, अशा भेटवस्तू द्याव्यात’, असे मला वाटत असतांना माझ्या लहान भावाने त्या भेटवस्तू आधीच आणून ठेवल्या होत्या. त्याने सनातन पंचांग, सनातन कुंकू, लघुग्रंथ आदी वस्तू आणून त्या सुवासिनींना देण्याचे नियोजन केले होते. हे पाहून मला त्याचे कौतुक वाटले आणि परात्पर गुरु डॉक्टरांप्रती कृतज्ञता वाटली.’
– श्री. रामचंद्र पांगुळ, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |