रुग्णांना लुबाडल्याप्रकरणी शासनाच्या जनआरोग्य योजनेतून ६४१ रुग्णालयांना बाहेरचा रस्ता !

गुन्हे नोंद करून शासनाची रक्कम वसूल करणार !

छत्रपती संभाजीनगर – आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या रुग्णांवर दीड लाख रुपयांपर्यंतच्या मर्यादेत विनामूल्य उपचार करण्यासाठी अमलात आणलेल्या ‘महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजने’त अपव्यवहार केल्याप्रकरणी राज्यातील तब्बल ६४१ रुग्णालयांना योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे, अशी माहिती ‘राज्य आरोग्य हमी सोसायटी’ने दिली आहे. आर्थिक अपहार उघड झालेल्या रुग्णालयांकडून अपहाराची रक्कम वसूल करून त्यांच्यावर गुन्हेही नोंद केले जाणार आहेत.

तत्कालीन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने वर्ष २०१३ मध्ये ही योजना संपूर्ण राज्यात लागू केली. वर्ष २०१४ मध्ये भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर या योजनेचे नाव पालटून ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’, असे करण्यात आले. या योजनेत आजघडीला सव्वा दोन कोटी कुटुंबांची नोंदणी आहे. या वर्षी ‘युनायटेड इंडिया इन्श्युरन्स’ आस्थापन या सार्वजनिक क्षेत्रातील विमा आस्थापनाच्या वतीने उपचारांसाठी ९९६ कुटुंबांना प्रतिवर्ष दीड लाख रुपयांपर्यंतचे विम्याचे कवच देण्यात आले आहे. या विम्याचा हप्ता राज्य सरकार भरते.

असे आहे योजनेचे स्वरूप…

राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील पिवळे, केशरी, अंत्योदय, अन्नपूर्णा योजनेतील शिधापत्रिकाधारक, मराठवाड्यातील पांढरे शिधापत्रिकाधारक, शासकीय अनाथाश्रमातील मुले, शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी, शासकीय आश्रमातील महिला, शासकीय वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक, माहिती, जनसंपर्क कार्यालयाकडे नोंद असलेले पत्रकार अन् त्यांच्यावर अवलंबून असलेले कुटुंबीय, महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणीकृत बांधकाम कामगार यांच्यासाठी ही योजना आहे. या योजनेत दीड लाख रुपयांपर्यंतचे उपचार अंगीकृत असलेल्या रुग्णालयांमध्ये विनामूल्य आहेत. प्रत्येक आजारासाठी शासनाने ठरवून दिलेले व्ययाचे ‘पॅकेज’ आहे. किडनी ट्रान्सप्लांटसाठी मात्र अडीच लाख रुपयांची मर्यादा ठेवण्यात आली आहे.

कोरोनाच्या काळात बनावट रुग्णांवर उपचार केल्याचे दाखवले !

कोरोनाच्या पहिल्या लाटेत या योजनेत उपचारांचा समावेश नव्हता. दुसर्‍या लाटेत समावेश केल्यानंतर काही रुग्णालयांनी बनावट उपचारांची प्रकरणे करण्याचा धडाकाच लावला. रुग्णांना महिती होऊ न देता काही रुग्णालयांनी परस्पर उपचारांचा समावेश केला आणि पुन्हा रुग्णांकडूनही पैसे घेतल्याचेही प्रकार घडले. याशिवाय कोरोनाच्या काळात जे उपचार रुग्णांवर केलेच नाहीत, अशा उपचारांचेही दप्तर सिद्ध करून योजनेतून पैसे उकळल्याचे उघड झाले.

विविध प्रकारे फसवणूक करून पैसे लाटणे !

या योजनेत संबंधित रुग्णांवरील उपचार समाविष्ट केल्यावरही रुग्णांकडून ठराविक अधिक रक्कम उकळणे, जेवढे उपचार केले, त्यापेक्षा अधिक उपचारांचे प्रकरण प्रविष्ट करणे, एखादा रुग्ण या जनआरोग्य योजनेस पात्र असतांनाही योजनेतून उपचार करण्यास नकार देणे, प्रत्यक्षात रुग्णाचा आजार एक, योजनेत दुसराच आजार दाखवणे, रुग्णांना अंधारात ठेवून सर्व उपचार योजनेत बसवणे, रुग्णांकडून पूर्ण रक्कम घेऊनही योजनेतूनही पैसे लाटणे आणि नियोजित वेळेत उपचारांच्या रकमांचे प्रकरण प्रविष्ट न करणे अशा विविध युक्त्या योजून रुग्णालयांनी या योजनेचे पैसे लाटले.

‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ असतांनाही त्याद्वारे रुग्णांची प्रचंड लुबाडणूक करणार्‍या रुग्णालयांचा अधिकृत परवाना रहित करून या रुग्णालयाचे मुख्य आधुनिक वैद्य अथवा मालक यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा. या योजनेत अपव्यवहार करणार्‍या संबंधित आधुनिक वैद्यांना कठोर शिक्षा करणे आवश्यक !

रुग्णांनी तक्रार करावी

‘महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना’ तळागाळातील गरिबांसाठी आहे; मात्र काही रुग्णालये निवळ बनावटगिरी करत असल्याचे लक्षात आल्याने त्यांना या योजनेतून वगळले आहे. गंभीर अपव्यवहार असलेल्या रुग्णालयांकडून अपहाराची रक्कम वसूल करून गुन्हेही नोंद केले जातील. योजनेत बसवूनही एखादे रुग्णालय अधिक पैसे मागत असेल, तर रुग्णांनी तक्रार करावी. – शिवानंद टाकसाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना, मुंबई

संपादकीय भूमिका 

गरिबांसाठी शासनाने केलेल्या योजनांचा अपलाभ उठवून पैसे उकळणारी रुग्णालये आणि त्यांचे पदाधिकारी समाजद्रोहीच !