छत्रपती संभाजीनगर येथे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ !

सर्व आरोग्य केंद्रांवर होणार कोरोनाची चाचणी !

प्रतिकात्मक छायाचित्र

छत्रपती संभाजीनगर – राज्यासमवेत शहरात पुन्हा एकदा कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक ती काळजी घेतांनाच संशयित रुग्णांची कोरोना चाचणी वाढवण्यावर भर दिला जाणार आहे, अशी माहिती महानगरपालिका आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली आहे. यासाठी महापालिकेच्या प्रत्येक आरोग्य केंद्रावर ‘टेस्टिंग किट’ उपलब्ध करून दिले जाणार असून तशा सूचना वैद्यकीय अधिकार्‍यांना करण्यात आल्या आहेत.

५ एप्रिल या दिवशी महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत सर्व आरोग्य अधिकारी आणि केंद्रावरील प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांना कोरोनाच्या पडताळण्या वाढवणे अन् इतर सर्व पडताळण्या सर्व आरोग्य केंद्रांवर करण्याविषयी निर्देश देण्यात आले. यासाठी सर्व केंद्रांवर ‘टेस्टिंग कीट’ उपलब्ध करून द्याव्या, चाचण्या वाढवाव्या, संशयित रुग्णांच्या पडताळण्या कराव्या, सक्रीय रुग्णांच्या संपर्कातील संशयितांनी चाचणी करून घ्यावी, रुग्णांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवावेत, असे सांगण्यात आले.

५ एप्रिल या दिवशी शहरात ४, तर ग्रामीण भागात १ असे ५ नवे रुग्ण आढळले. सध्या जिल्ह्यात ६६ सक्रीय रुग्ण असून यांतील ३ रुग्ण खासगी रुग्णालयात, तर ६३ जण घरीच उपचार घेत आहेत. छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यात ३ एप्रिलपासून सातत्याने कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत चढ-उतार चालू आहे. शहरातील विविध भागांत कोरोनाचा फैलाव वाढला असतांना ग्रामीण भागांतील अनेक तालुक्यांमध्ये रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.